कोकणवासीयांना बाप्पा पावले: गणेशोत्सवासाठी मुंबई-कोकण १५०० पेक्षा जास्त मोफत एसटी बसेस सज्ज

कोकणवासीयांना बाप्पा पावले: गणेशोत्सवासाठी मुंबई-कोकण १५०० पेक्षा जास्त मोफत एसटी बसेस सज्ज

मोदी व शिवसेना एक्सप्रेससह राजकीय पक्षांच्या मोफत गाड्या रवाना; परतीचा प्रवास मात्र स्वखर्चाने करावा लागणार

गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरांतून आपापल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो कोकणवासीयांचा प्रवासाचा प्रश्न यंदा सुटला आहे. मध्य व पश्चिम रेल्वेच्या नियमित गाड्यांसह विशेष ट्रेन्सचे आरक्षण फुल्ल झाल्यामुळे गावी कसे जायचे, असा गंभीर प्रश्न प्रवाशांसमोर उभा राहिला होता. मात्र, भाजप आणि शिवसेनेच्या माध्यमातून शहरातून शुक्रवारी रात्रीपासून ते रविवारी कालावधीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी १,५०० पेक्षा जास्त मोफत एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत.

रेल्वेच्या फुल्ल आरक्षणावर मोफत बसेसचा पर्याय

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांचे आरक्षण चार महिने आधीच फुल्ल झाले होते. इतकेच नव्हे तर जाहीर झालेल्या विशेष रेल्वेंचे आरक्षणही अवघ्या दोन मिनिटांत हाउसफुल्ल झाले. अशा परिस्थितीत कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी नितेश राणे आणि निलेश राणे या बंधूंनी दादर येथून ‘मोदी एक्सप्रेस’ व ‘शिवसेना एक्सप्रेस’ या नावाने विशेष मोफत गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली आणि कुडाळसाठी सोडल्या आहेत.

तसेच मुंबई भाजप व मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पुढाकाराने संपूर्ण मुंबई व उपनगरांतून मोफत एसटी बसेस चालवण्यात येत आहेत. यासाठी एसटी महामंडळाच्या विविध जिल्ह्यांतील आगारांमधून बसेस वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील मैदानात दाखल झाल्या आहेत.

"कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या हाउसफुल्ल झाल्याने गावी जाण्यासाठी कोकणवासीयांची होणारी वणवण बघून भारतीय जनता पक्षाच्या निर्देशानुसार कोकण विकास आघाडीने कोकणात विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला. कोकणात आपल्या मूळ गावी जाऊन त्यांनी आनंदात उत्सव साजरा करावा एवढीच अपेक्षा आहे."

  • श्रावणी मिलिंद पारकर, उपाध्यक्ष, कोकण विकास आघाडी

येथून सुटणार मोफत गाड्या

मुंबई व उपनगरांतील भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर पश्चिम, परळ, लालबाग, काळाचौकी, गिरगाव, नायगाव, दादर, वांद्रे पूर्व, खार पूर्व, जोगेश्वरी, दहिसर आणि बोरिवली या प्रमुख ठिकाणांवरून या बसेस सोडण्यात येत आहेत. यामध्ये अनेक बसेस तालुका निहाय, तर काही थेट गावांपर्यंत नियोजित करण्यात आल्या आहेत.

परतीचा प्रवास स्वखर्चानेच करावा लागणार

गणेशोत्सवासाठी गावी जाताना मोफत प्रवासाची सोय झाली असली, तरी परतीचा प्रवास मात्र कोकणवासीयांना स्वतःच्या खर्चानेच करावा लागणार आहे. गौरी-गणपती विसर्जनानंतर लाखो नागरिक जेव्हा मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघतील, तेव्हा राजकीय पक्षांच्या मोफत गाड्या उपलब्ध असणार नाहीत. त्यामुळे मिळेल त्या ट्रेनने गर्दीतून किंवा खासगी ट्रॅव्हल्सचे दामदुप्पट भाडे देऊनच प्रवाशांना मुंबई गाठावी लागणार आहे.