१७ वर्षांची प्रतीक्षा संपली; मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही मार्गिका सुरू झाल्याने चाकरमान्यांचा प्रवास सुखकर
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असताना, कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवास विनावाहतूक कोंडीचा व सुखकर व्हावा, यासाठी लांजा शहरातील उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिका अखेर वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. उड्डाणपूल पूर्णपणे सुरू झाल्याने चाकरमानी व स्थानिक प्रवास वर्ग आणि लांजावासीयांतून मोठे समाधान व्यक्त होत आहे.
१७ वर्षांपासून रखडलेले काम अखेर पूर्ण
शहरातून जाणारा मुंबई-गोवा महामार्ग आणि येथील उड्डाणपुलाचे काम गेल्या १७ वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या स्थितीत होते. अर्धवट कामाचा मोठा त्रास लांजावासीयांना सहन करावा लागत होता. त्यामुळे हा पूल नक्की कधी पूर्ण होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात होता.
दरम्यान, २० ऑगस्ट रोजी या उड्डाणपुलावरून मुंबई ते गोवा या दिशेने जाणारी एकेरी वाहतूक प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर गणेशोत्सवापूर्वी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिका पूर्णपणे सुरू करण्यासाठी स्थानिक आमदार किरण सामंत यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्न केले होते.
वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर
अखेर गणेशोत्सवाच्या तोंडावर उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. महामार्गाच्या दोन्ही लेन सुरू झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरून गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची दरवर्षी होणारी ट्रॅफिकची मोठी गैरसोय आता दूर झाली आहे. या पुलामुळे लांजा शहरात गणेशोत्सवाच्या काळात होणारी गंभीर वाहतूक कोंडीची समस्याही कायमची सुटण्यास मदत होणार आहे.













