सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही; अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वांद्री स्टॉपनजीक नवीन पुलाच्या मागील बाजूस आज, शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कार आणि मासे वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप यांच्यात भीषण अपघात घडला. दोन्ही वाहनांमध्ये झालेली धडक इतकी जोरदार होती की यामध्ये दोन्ही वाहनांचा चक्काचूर होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा
अपघातानंतर दोन्ही अपघातग्रस्त वाहने थेट महामार्गाच्या मधोमधच अडकून पडल्याने मार्गावरील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आधीच वाढलेली वाहनांची वर्दळ आणि त्यात झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांना व वाहनचालकांना काही काळ तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.













