रत्नागिरीत अनधिकृत टपऱ्यांवरील कारवाईने मारुती मंदिर परिसर मोकळा; नागरिकांकडून स्वागत

रत्नागिरीत अनधिकृत टपऱ्यांवरील कारवाईने मारुती मंदिर परिसर मोकळा; नागरिकांकडून स्वागत

गणेशोत्सवानंतर शहराच्या उर्वरित भागात फिरणार हातोडा; टपऱ्यांच्या भाडेतत्त्वावरील धंद्याला बसला चाप

रत्नागिरी : रत्नागिरी शहराचे रूपांतर स्मार्ट सिटीमध्ये होत असताना रस्त्यांचे विद्रुपीकरण करणाऱ्या आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेने धडक कारवाई केली आहे. मारुती मंदिर आणि परिसरातील फुटपाथवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अनधिकृत टपऱ्या हटवल्यानंतर हा परिसर आता पूर्णपणे स्वच्छ व मोकळा दिसू लागला आहे. पालिकेच्या या धडक मोहिमेमुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळे फुटपाथ उपलब्ध झाले असून, नागरिकांमधून या कारवाईचे जोरदार स्वागत केले जात आहे.

गणेशोत्सवानंतर शहरातील इतर भागांत धडक कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील गर्दी आणि सणाचा उत्साह लक्षात घेऊन ही मोहीम सध्या तात्पुरती थांबवण्यात आली आहे. मात्र, गणेशोत्सव संपताच शहरातील उर्वरित भागांमध्ये अनधिकृत टपऱ्या व अतिक्रमणांविरोधात जोरदार मोहीम राबवली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. या मोहिमेत पालिकेने सातत्य ठेवावे, जेणेकरून शहरात पुन्हा अनधिकृत बांधकामे उभी राहणार नाहीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

भाड्याने टपऱ्या देण्याच्या काळ्या धंद्याला चाप

शहरातील फुटपाथवरील या अनधिकृत टपऱ्या केवळ वाहतुकीलाच अडथळा ठरत नव्हत्या, तर अनेक ठिकाणी या टपऱ्यांच्या आडून अनधिकृत व गैरकायदेशीर धंदेही सुरू होते. धक्कादायक बाब म्हणजे एकाच व्यक्तीने अनेक ठिकाणी अशा टपऱ्या उभारून त्या इतरांना अव्वाच्या सव्वा भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला होता. नगरपरिषदेच्या या कठोर कारवाईमुळे अशा व्यावसायिक साखळीला आणि अनधिकृत धंद्यांना मोठा चाप बसला आहे.