१२४ ग्रॅम गांजा आणि नंबरप्लेट नसलेली दुचाकी जप्त; १ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात
भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील स्मशानभूमीजवळ गांजा बाळगून थांबलेल्या दोघांवर रत्नागिरी शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १२४ ग्रॅम गांजासदृश अमली पदार्थ आणि नंबरप्लेट नसलेली सुझुकी ॲक्सेस १२५ दुचाकी असा एकूण १ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भाट्ये स्मशानभूमीजवळ कारवाई
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार पांडुरंग बाबू गोरे (वय ५४) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही धडक कारवाई १० सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २.१८ वाजण्याच्या सुमारास शहरालगतच्या भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील स्मशानभूमीजवळ करण्यात आली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपी सक्षम आनंद गुरव (वय १९, रा. सुभाष रोड, परटवणे, रत्नागिरी) आणि साहिल सईद खान (वय ३१, रा. कोकणनगर, मराठी शाळेजवळ, रत्नागिरी) यांच्यावर कारवाई केली आहे. दोघेही भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील स्मशानभूमीजवळ अमली पदार्थाच्या सेवनाच्या उद्देशाने थांबले असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मुद्देमाल आणि एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून २ हजार ५०० रुपये किमतीचा १२४ ग्रॅम गांजासदृश अमली पदार्थ जप्त केला. यासोबतच १ लाख ३० हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची, पुढे-मागे नंबरप्लेट नसलेली ॲक्सेस १२५ दुचाकीही ताब्यात घेण्यात आली.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायदा १९८५ मधील कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थाचा स्रोत (Source) आणि संबंधित व्यक्तींच्या संपर्काबाबत शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.













