रत्नागिरी : ओबीसी, एससी-एसटी शेतकऱ्यांसाठी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर विशेष मोहीम; सिंचनासाठी ८० टक्क्यांपर्यंत अनुदान

रत्नागिरी : ओबीसी, एससी-एसटी शेतकऱ्यांसाठी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर विशेष मोहीम; सिंचनासाठी ८० टक्क्यांपर्यंत अनुदान

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज अनिवार्य; काजू कलमांचे मोफत वाटप

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन २०२६-२७ साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत विविध योजनांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारक, अनुसूचित जाती-जमाती तसेच महिला शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

सिंचनासाठी ८० टक्क्यांपर्यंत भरीव अनुदान

प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ५५ टक्के अनुदान मिळणार आहे. त्यावर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत २५ टक्के पूरक अनुदान देण्यात येणार असल्याने पात्र शेतकऱ्यांना एकूण ८० टक्के अनुदानाचा थेट लाभ मिळणार आहे. यामुळे ठिबक व तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर वाढून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे शक्य होणार आहे. इतर पात्र शेतकऱ्यांना कमाल ५ हेक्टर क्षेत्रासाठी देय असलेल्या ४५ टक्के अनुदानावर ३० टक्के पूरक अनुदान देण्यात येणार असून त्यांना एकूण ७५ टक्के अनुदान मिळणार आहे.

‘मागेल त्याला काजू कलमे’ योजनेत मोफत रोपे

‘मागेल त्याला काजू कलमे’ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना किमान १० ते कमाल ५० काजू कलमांची रोपे पूर्णपणे मोफत वितरित करण्यात येणार आहेत. कोकणातील काजू लागवडीला चालना देण्याबरोबरच शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

कृषी यांत्रिकीकरण आणि फलोत्पादनाला चालना

शेतीची कामे सुलभ करण्यासाठी विविध यंत्रे व अवजारांच्या खरेदीवर ५० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत रोपवाटिका स्थापना, क्षेत्रविस्तार आणि किवी, अननस, पपई यांसारख्या उच्च उत्पन्न देणाऱ्या फळपिकांच्या लागवडीसाठीही आर्थिक लाभ दिला जाणार आहे.

महाडीबीटी (MahaDBT) वर ऑनलाईन अर्ज अनिवार्य

या सर्व कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्जांची निवड ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या निकषावर केली जाणार आहे. अर्ज करताना शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी (Farmer ID), बँक पासबुकची प्रत आणि जात प्रमाणपत्र ही आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.