रत्नागिरीत करबुडे येथील २७ वर्षीय तरुणाचे गूढ अपहरण; ग्रामीण पोलिसांत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरीत करबुडे येथील २७ वर्षीय तरुणाचे गूढ अपहरण; ग्रामीण पोलिसांत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

गणपतीची पूजा करून ‘निवळी येथे जातो’ सांगून निघाला अन् बेपत्ता; कुटुंबीयांची अपहरणाची तक्रार

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या धामधुमीत घरात बाप्पाची पूजा करून बाहेर पडलेला २७ वर्षीय तरुण संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे घडली आहे. सर्व नातेवाईक, सासरवाडी व मित्रांकडे शोध घेऊनही कोणताही ठावठिकाणा न लागल्याने अज्ञात इसमाने त्याचे अपहरण केल्याची तक्रार वडिलांनी दिली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पूजा आटोपून बाहेर पडला अन् परतलाच नाही

मिळालेल्या माहितीनुसार, करबुडे मुळगाव येथील रहिवासी प्रफुल्ल प्रकाश तांबे (वय २७) हा १४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरातील गणपतीची विधिवत पूजा आटोपून पावणेबाराच्या सुमारास "मी निवळी येथे जाऊन येतो" असे सांगून घरातून निघाला. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही.

infigo

शोध घेऊनही सुगावा न लागल्याने पोलिसांत धाव

कुटुंबीयांनी तातडीने प्रफुल्लच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तसेच त्याच्या सासरवाडीत सर्वत्र चौकशी केली; मात्र त्याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही. अखेर कोणीतरी अज्ञात इसमाने गुप्तपणे व बेकायदेशीररीत्या डांबून ठेवण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण केल्याची खात्री झाल्याने वडील प्रकाश गोपाळ तांबे (वय ६०) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे गाठले.

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रफुल्ल तांबे याचा मोबाईल सीडीआर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कसून शोध घेत आहेत.