कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) अंतर्गत २०१ जागांसाठी महाभरती जाहीर; २८ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाची संधी

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) अंतर्गत २०१ जागांसाठी महाभरती जाहीर; २८ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाची संधी

स्टेशन मास्टर, लोको पायलटसह तांत्रिक व प्रशासकीय पदांचा समावेश; पदवीधर आणि आयटीआय धारकांसाठी मोठी संधी

रत्नागिरी : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) मार्फत विविध विभागांतील एकूण २०१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेंतर्गत तांत्रिक, परिचालन आणि प्रशासकीय अशा १२ विविध संवर्गांतील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. कोकण रेल्वेत नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही महत्त्वाची संधी उपलब्ध झाली असून इच्छुक उमेदवारांना २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.

२०१ रिक्त पदांचा सविस्तर तपशील :
कोकण रेल्वेच्या भरती जाहिरातीनुसार एकूण २०१ जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये ज्युनियर इंजिनिअर (Civil) – २५ पदे, ट्रॅक मेंटेनर – ५७ पदे, सिनियर सेक्शन इंजिनिअर (S&T) – ५ पदे, ईएसटीएम-३ (ESTM-III) – १५ पदे, सेक्शन कंट्रोलर – ९ पदे, स्टेशन मास्टर – १५ पदे, गुड्स ट्रेन मॅनेजर – १० पदे, असिस्टंट लोको पायलट – ३० पदे, सिनियर सेक्शन इंजिनिअर (Mechanical) – ६ पदे, ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) – ७ पदे, टेक्निशियन-३ (Mechanical) – १५ पदे आणि कमर्शियल सुपरवायझर – ७ पदे अशा विविध पदांचा समावेश आहे.

विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता :
या भरती प्रक्रियेतील पदांनुसार स्वतंत्र शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. स्टेशन मास्टर, सेक्शन कंट्रोलर, गुड्स ट्रेन मॅनेजर आणि कमर्शियल सुपरवायझर या पदांसाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. ट्रॅक मेंटेनर पदासाठी १०वी उत्तीर्ण ही किमान पात्रता असून, टेक्निशियन आणि असिस्टंट लोको पायलट पदासाठी १०वी उत्तीर्णसह संबंधित ट्रेडमधील आयटीआय (NCVT/SCVT) किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा आवश्यक आहे. याशिवाय ज्युनियर इंजिनिअर आणि सिनियर सेक्शन इंजिनिअर या पदांसाठी संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदविका (Diploma) अथवा अभियांत्रिकी पदवी (Degree) असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Sahyog multi.

वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क :
उमेदवारांचे वय १ ऑगस्ट २०२६ रोजी विचारात घेतले जाणार असून ट्रॅक मेंटेनर पदासाठी वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे आणि उर्वरित इतर सर्व पदांसाठी १८ ते ३६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. शासकीय नियमांनुसार अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) प्रवर्गासाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गासाठी ३ वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. खुला प्रवर्ग, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी १ हजार १८० रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार असून, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना संगणक आधारित चाचणीला (CBT) उपस्थित राहिल्यानंतर बँक शुल्क वजा करून उर्वरित शुल्क परत दिले जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया व परीक्षेचे स्वरूप :
इच्छुक व पात्र उमेदवारांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनेच आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत असणार आहे. या सर्व पदांसाठी संगणक आधारित परीक्षा (CBT) सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित केली जाणार असून कोकण रेल्वे कार्यक्षेत्रामध्ये ही सेवा असणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.