मुंढे येथील रस्त्यावरील घटना; वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी वन्यप्राण्याला उपचारासाठी चिपळूणला हलवले
चिपळूण: Chiplun Sambar Rescue या घटनेत गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुंढे येथील रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेत एक सांबर जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या अपघाताची माहिती मिळताच शिरगावचे माजी उपसरपंच नागेश सोलकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्थानिक युवकांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे आणि तत्परतेमुळे जखमी सांबराला वेळेत वैद्यकीय मदत मिळणे शक्य झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर-विजापूर मार्गावरील मुंढे रस्त्यावरून जात असताना एका ट्रकची रस्ता ओलांडणाऱ्या सांबराला जोरदार धडक बसली. या अपघातात सांबर गंभीर जखमी होऊन रस्त्यावरच पडले होते. ही बाब शिरगावचे माजी उपसरपंच नागेश सोलकर यांना समजताच त्यांनी तात्काळ काही युवकांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी सांबराची पाहणी केली.
वन विभागाच्या मदतीने जखमी सांबरावर उपचार सुरू
जखमी सांबराची नाजूक परिस्थिती लक्षात घेऊन नागेश सोलकर यांनी तातडीने वन विभागाला या अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमी सांबराला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्याला चिपळूण येथे हलविण्यात आले आहे. माजी उपसरपंच नागेश सोलकर आणि स्थानिक युवकांनी दाखवलेल्या या भूतदयेचे व तत्परतेचे परिसरातून कौतुक होत आहे.














