रत्नागिरी: Blue Flag Certification Ratnagiri या ऐतिहासिक कामगिरीअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य लाडघर आणि गुहागर या दोन समुद्रकिनाऱ्यांना २०२६-२७ या हंगामासाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ (Blue Flag) प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. या जागतिक दर्जाच्या सन्मानामुळे महाराष्ट्राच्या पर्यटन शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना प्रत्यक्ष शुभेच्छा देत या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले.
डेन्मार्कमधील ‘फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन’ (FEE) या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत जगातील सर्वोत्तम, सुरक्षित आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांना हे मानांकन दिले जाते. यासाठी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, सागरी जैवविविधतेचे संरक्षण, पर्यटकांची सुरक्षितता आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन अशा अत्यंत कठोर आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता करावी लागते. लाडघर आणि गुहागर किनाऱ्यांनी या सर्व निकषांवर आपली मोहर उमटवत हा बहुमान पटकावला आहे. हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवण्यामागे राज्य शासन, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक नागरिकांचे एकत्रित व समन्वित प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभिनंदन सोहळा
पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या शुभेच्छांच्या प्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्यासह प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे आणि जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकणच्या जागतिक पर्यटनाला आणि रोजगाराला मिळणार चालना
‘ब्लू फ्लॅग’ मानांकनामुळे लाडघर आणि गुहागर हे दोन्ही समुद्रकिनारे आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे झळकणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होणार असून, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. कोकणातील समृद्ध सागरी पर्यावरणाचे जतन आणि शाश्वत पर्यटनाला या निर्णयामुळे मोठी चालना मिळणार आहे. हा सन्मान केवळ रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव नसून, कोकणच्या निसर्गसौंदर्याचे संवर्धन करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.













