हर्णै, मुरुड, कर्दे आणि लाडघर किनाऱ्यांवर मोठी गर्दी; पर्यटनवाढीमुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिक, खानावळी आणि मासळी विक्रेत्यांची मोठी आर्थिक उलाढाल
दापोली: Dapoli Tourism Diwali Rush या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी दापोली तालुक्यातील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. तालुक्यातील विविध पर्यटनस्थळे आणि किनारे पर्यटकांनी गजबजून गेले असून राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक दापोलीत दाखल झाले आहेत. समुद्राच्या लाटांचा आनंद, निसर्गरम्य परिसर आणि कोकणातील अस्सल खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची विशेष पसंती दापोलीला मिळत आहे.
दापोलीच्या पर्यटनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथील स्वच्छ समुद्रकिनारे आणि ताजी मासळी. तालुक्यातील हर्णै, मुरुड, कर्दे आणि लाडघर यांसारख्या प्रसिद्ध किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. समुद्रकिनाऱ्यावर फिरणे, लाटांमध्ये खेळणे, छायाचित्रे काढणे आणि कुटुंबीयांसोबत निवांत वेळ घालवणे यामध्ये पर्यटक रमले आहेत.
ताज्या मासळीची भुरळ आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
या पर्यटन हंगामात पर्यटकांना येथील ताज्या मासळीच्या चवीची विशेष भुरळ पडली आहे. अनेक पर्यटक स्वतः स्थानिक मासळी बाजारात जाऊन ताजी मासळी खरेदी करत आहेत आणि ती हॉटेल किंवा घरगुती खानावळीत देऊन कोकणी पद्धतीने तयार केलेल्या माशांच्या विविध पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत. या प्रक्रियेमुळे स्थानिक मासळी विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि घरगुती खानावळींमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.

दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत लाखोंच्या संख्येने पर्यटक दापोली तालुक्याला भेट देतात. या वाढत्या पर्यटनामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली असून हॉटेल, लॉजिंग, खानावळी, मासळी विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक तसेच स्थानिक तरुणांच्या रोजगारालाही मोठा हातभार लागत आहे.













