नरेंद्र मोदींना परिसीमन विधेयक मंजूर करण्यासाठी १५-१६ खासदारांची गरज असून शरद पवारांच्या खासदारांवर डोळा असण्याचा दावा
नवी दिल्ली: Prithviraj Chavan on NCP Merger या विषयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट हा आमच्या महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष असून पवारसाहेब स्वतः महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षात काय चालले आहे यावर तर्कवितर्क करणे योग्य होणार नाही, असे ते म्हणाले. मात्र, नरेंद्र मोदींना परिसीमन (डिलिमिटेशन) विधेयक मंजूर करायचे असून त्यासाठी त्यांना १५-१६ खासदारांची गरज असल्यामुळेच या चर्चांना उधाण आल्याचा दावा त्यांनी केला.
नरेंद्र मोदींना परिसीमन विधेयक आणण्याची घाई झाली असून ते विधेयक महिला आरक्षणाचे नाव सांगून पुढे केले जात आहे, परंतु ही निव्वळ फसवणूक आहे कारण महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्येच पारित झाले आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. आता नवीन महिला आरक्षण विधेयक आणून त्यांना सीमांकन करायचे आहे, जो त्यांचा अधिकार आहे. परंतु सीमांकन करताना दक्षिणेच्या राज्यांवर अन्याय होणार नाही हा मुख्य मुद्दा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जी चर्चा सुरू आहे, ती यासाठी चालू आहे की त्यांना परिसीमन विधेयक पास करण्यासाठी १५-१६ मतांची गरज आहे, कारण ते घटना दुरुस्ती विधेयक असल्याने ही मते गोळा करणे आवश्यक आहे. कदाचित त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ खासदारांवर डोळा असू शकतो, असे चव्हाण म्हणाले. हे खासदार आले तर संख्या पूर्ण होण्यास मदत होईल आणि उरलेली मतेही सहज गोळा केली जातील, कारण सगळा पैशाचा खेळ सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बदलांचा थेट संबंध हा नरेंद्र मोदींना डिलिमिटेशन विधेयक पारित करण्याशी असल्याचे सांगत, आगामी दोन-तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत: पृथ्वीराज चव्हाण
शरद पवारांच्या राजकीय पार्श्वभूमीचा विचार करता त्यांना डाव्या विचारसरणीची (Left of Center) पार्श्वभूमी लाभली आहे. त्यांचे कुटुंब आणि वडील हे शेतकरी कामगार पक्षाच्या विचारसरणीचे होते आणि त्यांनी बहुतेक काळ याच विचारधारेचे राजकारण केले आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार त्यांनी मांडला आहे. अशा स्थितीत ६० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर ते जर भाजपसोबत गेले किंवा जातीयवादी पक्षांना साथ दिली, तर त्याचा अर्थ हे केवळ स्वार्थासाठी केले गेले असा होईल, असे सांगत चव्हाण यांनी पवार एनडीएसोबत जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.

तथापि, राजकारणात शेवटी काय होईल हे सांगता येत नसले तरी भेटीगाठींच्या चर्चांचा भारतीय राजकारणावर आणि इंडिया आघाडीवर निश्चितच परिणाम होईल, असे ते म्हणाले. सर्व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन जर एनडीएकडे गेली, तर इंडिया आघाडीचा एक घटक पक्ष बाजूला होईल आणि आमची ताकद काही प्रमाणात कमी होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.













