Lanja Gold Chain Snatching: फोटो काढण्याच्या बहाण्याने ६० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र लांबवले

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने केला पाठलाग; अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल

लांजा: Lanja Gold Chain Snatching Veravali अंतर्गत तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका ६० वर्षीय वृद्ध महिलेला दुचाकीवर बसवून नंतर ‘फोटो काढतो’ असे सांगत तिच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून अज्ञात भामट्याने पोबारा केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे वेरवली परिसरात तीव्र खळबळ उडाली असून, लांजा पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध मोहीम सुरू केली आहे.

Lanja Gold Chain Snatching Veravali: लिफ्ट देऊन केला पाठलाग

वेरवली खुर्द डोळेवाडी येथील रहिवासी सरिता दिनकर बाणे (वय ६०) या मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वेरवली बुद्रुक येथील दिलीप मुळे यांच्या घरी नेहमीप्रमाणे घरकामासाठी पायी जात होत्या. त्या वेरवली खुर्द शाळा क्रमांक १ च्या पुढील वळणाजवळ पोहोचल्या असता, पाठीमागून आलेल्या एका अनोळखी दुचाकीस्वाराने “आजी कुठे चालला आहात, तुम्हाला पुढे सोडतो” असे सांगत त्यांना गाडीवर बसवले.

त्या इसमाने त्यांना मुळे यांच्या घराच्या गेटपासून सुमारे १०० मीटर अंतरावर उतरवले. त्यानंतर बाणे या पायी चालत मुळे यांच्या घराच्या गेटजवळ पोहोचल्या असता, तो इसम पुन्हा दुचाकीवरून त्यांच्या मागोमाग आला.

‘फोटो काढतो’ असे सांगून हिसकावले १५ ग्रॅमचे मंगळसूत्र

“आजी थांबा, तुमचा फोटो काढतो” असे सांगून त्याने मोबाईलचा कॅमेरा बाणे यांच्या चेहऱ्याजवळ नेला. महिला काही समजून घेण्याच्या आतच त्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाचे, दोन पदरी सोन्याचे मंगळसूत्र (किंमत सुमारे ९० हजार रुपये) जबरदस्तीने खेचून तोडले आणि भरधाव वेगाने दुचाकीवरून पलायन केले.

Hotel waiter

लांजा पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू

या घटनेमुळे घाबरलेल्या सरिता बाणे यांनी तात्काळ लांजा पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही आणि उपलब्ध माहितीच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असून, पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:47 30-09-2026