१५ कोटींचे ‘बँक मनी’ दाखवून भुलवले; ऑनलाईन पैसे उकळत जीवे मारण्याची धमकी दिल्याने शहर पोलिसांत तक्रार
रत्नागिरी: Ratnagiri Fake Loan Fraud Scheme अंतर्गत ‘फक्त १ लाख रुपये भरा आणि अवघ्या १ टक्का व्याजदराने तब्बल १ कोटी रुपयांचे कर्ज मिळवा’, असे भुरळ पाडणारे आमिष दाखवून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे. या भामटेगिरीच्या जाळ्यात तब्बल ४० ते ४५ नागरिक अडकल्याची माहिती समोर येत असून, काही जणांना थेट ४ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याप्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून, यामागे मोठे आर्थिक रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Ratnagiri Fake Loan Fraud Scheme: १ लाख उकळून महिनाभर बोळवण
तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्ज प्रकरण मंजूर करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेने त्यांच्याकडून १ लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने उकळले. पैसे उकळल्यानंतर महिना उलटून गेला तरी प्रत्यक्ष कर्ज मंजूर झालेच नाही. फसवणूक झालेल्या नागरिकांनी जेव्हा याविषयी वारंवार विचारणा केली, तेव्हा त्यांना रोज नवीन तारखा देऊन बोळवण करण्यात आली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बाधितांनी पोलिसांत धाव घेतली.
१५ कोटींचे ‘बँक मनी’ अन् गणेशगुळे फाट्यावर मध्यरात्री रोकड वाटप
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात चक्रावणारी बाब म्हणजे तक्रारदारांना विश्वास बसवा म्हणून तब्बल १५ कोटी रुपयांची भलीमोठी रक्कम दाखवण्यात आली होती. ही रक्कम ‘बँक मनी’ असल्याचे भासवत ती गुहागर येथून आणल्याचा दावा संशयितांकडून करण्यात आला होता. या व्यवहाराशी संबंधित विविध व्यक्तींमध्ये लाखो रुपयांची ऑनलाईन देवाणघेवाण झाल्याचे पुरावेही तक्रारीत मांडण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर, चार दिवसांपूर्वी गणेशगुळे फाट्यावर मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद रित्या पैसे वाटपाचा कार्यक्रम पार पडल्याचा खळबळजनक दावा काही तक्रारदारांनी केला आहे.
जीवे मारण्याची धमकी अन् रिक्षेतून रोकड वाहतूक
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी जेव्हा स्वतःचे पैसे परत मागण्यास सुरुवात केली, तेव्हा संबंधित महिलेकडून त्यांना थेट जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. पोलीस तक्रार केल्यास किंवा १५ कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत तोंड उघडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा धाक दाखवण्यात आला. तसेच खोटे कागदपत्रे आणि धनादेश (चेक) तयार करून गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही देण्यात आली.
या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारात एका रिक्षेचा वापर केला जात असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या रिक्षेतूनच लाखो-कोटींच्या रोकडची वाहतूक केली जात असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने या रिक्षाचालकाचा आणि मालकाचा शोध घेऊन त्यांची कडक चौकशी करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण? पोलीस तपासाकडे लक्ष
अवघ्या एक लाखाच्या बदल्यात १ टक्का व्याजदराने कोट्यवधी रुपयांचे कर्ज देणारी ही कोणती आर्थिक यंत्रणा आहे? दाखवण्यात आलेली १५ कोटींची रक्कम नेमकी कोणाची होती? आणि यामागे कोणती मोठी गुन्हेगारी साखळी काम करत आहे? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत. या फसवणुकीत अनेक महिला व सामान्य नागरिक भरडले गेले आहेत. शहर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल झाल्यानंतर आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात आणि या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कधी गजाआड होतो, याकडे संपूर्ण रत्नागिरीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:47 30-09-2026















