Garjana morcha: ‘गर्जना मोर्चा’तून राज ठाकरेंचा थेट हल्लाबोल; बॅलेट पेपरवर निवडणुका आणि ‘SIR’ रद्द करण्याची मागणी

Garjana morcha: 'गर्जना मोर्चा'तून राज ठाकरेंचा थेट हल्लाबोल; बॅलेट पेपरवर निवडणुका आणि 'SIR' रद्द करण्याची मागणी

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कारभारावर सडकून टीका; ‘व्होट चोरी’ आणि १३ कोटी मतदार वगळल्याचा उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

*मुंबई :* मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी रविवारी मुंबईत भव्य ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्मित सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या संयुक्त मोर्चाला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयादरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील विविध विरोधी पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

*”२०१७ पासून मतचोरी सुरूच; निवडणुकांवर बहिष्कार टाकावा”*
गर्जना मोर्चानंतर महापालिका मुख्यालयासमोर घेतलेल्या सभेत बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “देशभरात सध्या मतचोरीमुळे वातावरण तापले आहे, पण मी २०१७ पासूनच या मतचोरीविरोधात आवाज उठवत आहे. त्यावेळी मी सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन मतपत्रिकांच्या मुद्यावर चर्चा केली होती आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते.”

*२०२४ च्या निकालांवर प्रश्नचिन्ह*
२०२४ च्या निवडणूक निकालांवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी राज्यात कुठेही लोकांमध्ये उत्साह किंवा जल्लोष दिसला नाही; सर्वत्र सन्नाटा पसरला होता. मग हा कसला विजय?” लोकसभा आणि विधानसभेत अचानक ४० ते ६० लाख मतदार कसे वाढले, असा सवाल करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली.

Baguass

*देशाचा ढाचा बदलण्याचा प्रयत्न*
केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका करताना त्यांनी देशाच्या आर्थिक व लोकशाही रचनेवर भाष्य केले. “सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, निवडणूक आयोग या सर्व स्वायत्त संस्थांवर ताबा मिळवून एकाच उद्योगपतीच्या हातात देश सोपवण्याचे काम सुरू आहे. जंगलं, प्रकल्प, बंदरे एकालाच दिली जात आहेत. काँग्रेसच्या काळातही उद्योगपती होते, पण आज सर्वकाही एकाच व्यक्तीसाठी चालले आहे,” असा आरोप त्यांनी केला.

*राज ठाकरेंच्या २ प्रमुख मागण्या:*
१. SIR रद्द करा: महाराष्ट्रात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अंतर्गत जवळपास २ कोटी मतदार वगळण्यात आले आहेत. माजी गृहसचिव आर. के. सिंह यांच्या मतानुसार एकाच वेळी संपूर्ण देशात Intensive Revision करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हा ‘SIR’ तातडीने रद्द करण्यात यावा.

२. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या: ईव्हीएमवरील संशय दूर करण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी यापुढील सर्व निवडणुका ‘बॅलेट पेपर’वर (मतपत्रिकेवर) घेण्यात याव्यात.

“सत्ता कोणाचीही येवो, पण ती योग्य आणि कायदेशीर मार्गाने आली पाहिजे. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन दिल्लीत याविरोधात आवाज उठवला पाहिजे,” असे आवाहन शेवटी राज ठाकरे यांनी केले.