रत्नागिरीत रंगला नाट्यसंगीताचा बहारदार सोहळा; ४१ बालकलाकारांच्या सादरीकरणाला रसिक श्रोत्यांची पसंती
*रत्नागिरी :* मुग्धनाद संगीत अकादमी, रत्नागिरी आयोजित ‘नाट्यकुंतल’ हा साभिनय नाट्यसंगीताचा बहारदार कार्यक्रम नुकताच रत्नागिरीतील गुरुकृपा मंगल कार्यालयात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि ‘हाऊसफुल’ वातावरणात पार पडला. प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या संकल्पनेतून आणि दिग्दर्शनातून कै. गजानन भट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
*दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ*
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. मुग्धा सामंत यांच्या मातोश्री श्रीमती सुजाता भट व मामा श्री. रवींद्र साठे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कै. गजानन भट यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर ‘नमन नटवरा’ या नांदीने कार्यक्रमाचा मंगलमय प्रारंभ झाला.
*एकापेक्षा एक सुरेख नाट्यपदांचे सादरीकरण*
कार्यक्रमात अकादमीच्या विद्यार्थ्यांनी ‘नाथ हा माझा’, ‘एकला नयनाला’, ‘नाही मी बोलत’, ‘मी पुन्हा वनांतरी’, ‘सजणा का धरिला परदेस’, ‘खरा तो प्रेमा’, ‘मर्मबंधातली ठेव ही’, ‘मधुकर वनवन’, ‘नको नको घाई नको’, ‘लागी कलेजवा कटार’, ‘हे सुरांनो’, ‘वद जाऊ कुणाला’, ‘प्रीती सुरी दुधारी’, ‘उगवला चंद्र पुनवेचा’, ‘म्हातारा इतुका’, ‘मूर्तिमंत भीती उभी’, ‘पावना वामना’ आणि ‘अंगणी पारिजात फुलला’ ही अजरामर नाट्यपदे साभिनय सादर केली. तसेच ‘संगीत शाकुंतल’मधील ‘पंच तुंड नर रुंड माल धर’ ही नांदीही सादर करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता ‘संगीत मूकनायक’ या नाटकातील ‘हे प्रभो विभो’ या नांदीने झाली.

*पुणे, मुंबई व रत्नागिरीतील ४१ विद्यार्थ्यांचा सहभाग*
या कार्यक्रमात मुग्धनाद संगीत अकादमीच्या पुणे, मुंबई व रत्नागिरी येथील तब्बल ४१ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. संपूर्ण कार्यक्रमाला श्री. प्रथमेश शहाणे यांनी तबला साथ, तर श्री. श्रीरंग जोगळेकर यांनी ऑर्गन साथ देत सुरेल संगीतसाथ दिली. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सौ. पूर्वा खालगांवकर यांनी केले.
*नेपथ्य आणि गुणी कलावंतांचे योगदान*
नाट्यपदांना साजेसे नेपथ्य श्री. प्रदीप तेंडुलकर व सहकाऱ्यांनी उभारले होते. ध्वनी व्यवस्था श्री. पांडुरंग बर्वे यांनी सांभाळली, तर कार्यक्रमासाठी श्री. प्रशांत जोशी यांनी फुलांची आकर्षक रांगोळी काढली होती.
*रत्नागिरीत संगीत नाटकाची परंपरा समृद्ध होणार*
मार्गदर्शनपर भाषणात सौ. मुग्धा भट-सामंत यांनी कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट करत सर्व बालकलाकारांच्या मेहनतीचे व पालकांच्या सहकार्याचे कौतुक केले. अशा उपक्रमांमधून रत्नागिरीला भविष्यात उत्तम गायक आणि अभिनेते लाभतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी गुरुकृपा मंगल कार्यालयाचे श्री. नाना मराठे, श्री. भगवान दामले, श्री. मंगेश मोरे आणि ‘खल्वायन’ संस्थेचे अध्यक्ष श्री. मनोहर जोशी यांचे आभार मानण्यात आले.













