गुरे बांधून घरी परतणाऱ्या ५२ वर्षीय प्रौढावर पाठीमागून हल्ला; ५५ वर्षीय आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद
लांजा (रत्नागिरी) :
लांजा तालुक्यातील शिपोशी जाधववाडी येथे जमिनीच्या वादातून एका ५५ वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत आपल्या शेजाऱ्याच्या डोक्यात लोखंडी कोयतीने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवीगाळ व धमकीची विचारणा केल्याचा राग; पाठीमागून कोयतीने वार :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय शंकर डाफळे (वय ५२ वर्षे, रा. शिपोशी जाधववाडी, ता. लांजा) आणि आरोपी श्रीकांत धोंडू जाधव (वय ५५ वर्षे, रा. शिपोशी जाधववाडी, ता. लांजा) हे एकाच वाडीत शेजारी राहणारे आहेत. या दोघांमध्ये गेल्या काही काळापासून जमीन व जागेवरून वाद सुरू आहेत. बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी श्रीकांत जाधव याने दारू पिऊन येऊन आरोपीच्या राहत्या घरासमोरील डांबरी रस्त्यावर फिर्यादी संजय डाफळे यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत फिर्यादींनी आरोपीला विचारणा केली होती. त्यानंतर फिर्यादी हे आपल्या मालकीची गुरे वाड्यात बांधून घरी जात असताना, संतापलेल्या आरोपीने त्यांच्या पाठीमागून येत लोखंडी कोयतीने त्यांच्या डोक्यात वार करून लहान-मोठ्या दुखापती केल्या.
लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद :
या हल्ल्यात फिर्यादी संजय शंकर डाफळे जखमी झाले असून, त्यांनी गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी श्रीकांत धोंडू जाधव याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१३/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि १३१ अन्वये गुन्हा दाखल केला असून लांजा पोलीस पुढील तपास करत आहेत.














