घरात बोलण्याचे निमित्त होऊन घराबाहेर बोलावून काठीने डोक्यात व पाठीवर वार; सोडवासोडव करण्यास आलेल्या पत्नीलाही दुखापत, दोन्ही बाजूंकडून गुन्हे नोंद
लांजा (रत्नागिरी) :
लांजा तालुक्यातील शिपोशी जाधववाडी येथे जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेत आता परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घरासमोर झालेल्या या मारहाणीत श्रीकांत धोंडू जाधव (वय ५५ वर्षे) आणि त्यांची पत्नी सौ. श्रावणी श्रीकांत जाधव (वय ५० वर्षे) हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात शेजारी संजय शंकर डाफळे (वय ५२ वर्षे, रा. शिपोशी जाधववाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमीन फसवणुकीच्या उल्लेखावरून वाद; घराबाहेर बोलावून काठीने मारहाण :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकांत धोंडू जाधव आणि आरोपी संजय शंकर डाफळे हे एकाच वाडीत शेजारी राहतात आणि त्यांच्यात जमीन-जागेवरून वाद सुरू आहेत. बुधवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास फिर्यादी श्रीकांत जाधव यांचा मुलगा श्रवण हा कामाला जात नसल्याच्या रागातून श्रीकांत जाधव हे घरात पत्नी व मुलाला शिवीगाळ करत होते. या दरम्यान, आरोपीने वडिलांकडून जमीन फसवून घेतलेली आहे, असे नावानिशी बोलत असताना आरोपी संजय डाफळे याने ऐकले. याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्या घराबाहेर येत "तू भाई झालास काय?" असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली आणि फिर्यादींना घराबाहेर बोलावून हातातील काठीने त्यांच्या डोक्यात, पाठीवर व हातावर मारहाण केली.
सोडवासोडव करणाऱ्या पत्नीलाही काठीचा मार; लांजा पोलिसांत गुन्हा नोंद :
या मारहाणीवेळी भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी यांची पत्नी सौ. श्रावणी श्रीकांत जाधव या मध्ये आल्या असता, त्यांच्याही हाता-पायाला काठी लागून लहान-मोठ्या दुखापती झाल्या. याप्रकरणी श्रीकांत धोंडू जाधव यांनी गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६.३८ वाजता लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संजय शंकर डाफळे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१४/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि १३१ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.














