Delimitation Bill संसदेत मांडण्याच्या हालचाली; राज्यसभा निवडणुकीतील पाठिंब्याची आठवण करून देत महाराष्ट्र काँग्रेसची पोस्ट
Delimitation Bill ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर ते आता संसदेत मांडले जाणार असून, हे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपप्रणित एनडीए सरकारला काही खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वर्तुळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि तामिळनाडूतील डीएमके पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाच्या विधेयकावर राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा देण्याची तयारी दाखवल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने समाजमाध्यमांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला शरद पवार यांच्या पक्षाच्या लोकसभेतील आठ खासदारांची गरज आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पक्षाने सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरसकट ५० टक्के जागा वाढवण्याच्या विरोधकांच्या मुद्द्याचा सरकारने विचार केल्यास सकारात्मक विचार करू, असे संकेत दिले होते आणि आता केंद्र सरकारने ती मागणी मान्य केल्याचे स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका जाहीर केली असली तरी पक्षाचे खासदार यावर स्पष्ट बोलणे टाळत असून सर्व खासदार एकत्र बसून निर्णय घेऊ, असे सांगत आहेत.

Delimitation Bill वर काँग्रेसचा विरोध आणि मार्च २०२६ मधील राज्यसभा निवडणुकीचा संदर्भ
काँग्रेसने या विधेयकाला विरोध करताना महिला आरक्षणाच्या आडून भविष्यातील राजकीय फायद्यासाठी भाजप मतदारसंघ पुनर्रचना करत असल्याचा आरोप केला आहे. यासोबतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने एक पोस्ट प्रसिद्ध करत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आठवण या पोस्टमध्ये करून देण्यात आली आहे:
त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते, तर एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची गरज होती.
काँग्रेसकडे १६ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते.
सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा मागितल्यानंतर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढेवेढे न घेता स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत वयाच्या ८५ व्या वर्षी शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पाठिंबा दिला होता.
त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही साथ दिल्याने महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली होती.
परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर आता तेच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांचा पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार असल्याचे नमूद करत काँग्रेसने ही पोस्ट केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.













