पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात प्रणिती शिंदेंची उपस्थिती; सरकारवर आणि MPSC अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल
पुणे :
MPSC आंदोलन प्रसंगी पुण्यातील गांजवे चौक परिसरातील आंदोलनाला भेट देत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर कडक शब्दांत टीका केली आहे. “येत्या दोन ते तीन दिवसांत पोलीस येणार आणि तुमच्यावर लाठीचार्ज होऊ शकतो, तरीही तुम्ही मागे हटायचे नाही; हा लढा सुरूच ठेवायचा आहे,” असा गंभीर दावा आणि आवाहन प्रणिती शिंदे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांसमोर बोलताना केले.
MPSC आंदोलन: “अटका झाल्या तरी मागे हटायचे नाही; आपली लढाई आता अंतिम टप्प्यात”
पुण्यात MPSC परीक्षांच्या विविध मागण्यांसाठी आणि MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात सहभागी होत प्रणिती शिंदे म्हणाल्या की, परवानगी असतानाही पोलिसांकडून अटका केल्या जात आहेत. मात्र, विद्यार्थ्यांनी अजिबात खचून न जाता अहिंसेच्या मार्गाने संघर्ष सुरु ठेवावा. “पहिली विकेट जंतरमंतरला गेली, आता दुसरी विकेट महाराष्ट्रात जाणार आहे. भीमनवार हे छोटे मासे आहेत. शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे. एसआयआरमध्ये १३ कोटी नावे डिलीट करण्यात आली आहेत. देशाचा डीएनए हा गांधींच्या विचारांचा, संविधानाचा आणि सर्वधर्मसमभावाचा आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
“पोलीस आपल्याला अटक करायला आले की सामील व्हायला?”
पुण्यातील आंदोलनाची परिस्थिती पाहताना भावूक झाल्याचे सांगत त्या म्हणाल्या, “मी जेव्हा इथे आले तेव्हा तुम्हाला बघून माझ्या डोळ्यात पाणी आले. युवाशक्ती काय असते आणि लोकशाही पुढे सर्वांना कसे झुकावे लागते, हे हे विद्यार्थी दाखवून देतील. पोलिसांना पाहून मला समजेना की ते आपल्या आंदोलनात सामील व्हायला आले आहेत की आपल्याला अटक करायला? हे सरकार अत्यंत निगरगट्ट आणि अहंकारी आहे.”
“मीसुद्धा MPSC करत होते; सरकारमुळे डॉक्टर-इंजिनियर नव्हे, तर अतिरेकी तयार होतील”
आपल्या वैयक्तिक अनुभवाचा संदर्भ देत खासदार शिंदे म्हणाल्या, “मीसुद्धा एकेकाळी MPSC चा अभ्यास करत होते, पण ते जमले नाही म्हणून मी लॉ (कायदा) क्षेत्र निवडले. आज एकीकडे शेतकऱ्यांचा आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांचा अंत पाहिला जात आहे. भाजपच्या या धोरणांमुळे आणि विचारसरणीमुळे देशात इंजिनियर किंवा डॉक्टर होण्याऐवजी अतिरेकी तयार होतील अशी वेळ आली आहे. जर आमच्यावर गुन्हे (FIR) दाखल झाले तरी ते मागे घेण्याची ताकद आपल्यात आहे.”
देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर आणि भीमनवार यांच्या राजीनाम्यावर निशाणा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पॅकेज मागायला दिल्लीला गेले होते, मात्र अजूनही अतिवृष्टीची योग्य मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. अतिवृष्टीचे पंचनामे झालेले नाहीत आणि शेतकरी, कामगार व महिलांवर अत्याचार सुरू आहेत. अधिकारी दबावाखाली काम करतात, त्यात त्यांचा दोष नाही. पण आता परिस्थिती बदलली आहे. MPSC अध्यक्ष भीमनवार यांची ‘विकेट’ घेतल्याशिवाय शांत बसायचे नाही,” असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 08-10-2026














