गणपतीपुळे, मालगुंडसह पाच गावांतील जमिनींच्या मोजणीत फेरफार केल्याचा आरोप; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे पेन्शन बंद करण्याची मागणी

गणपतीपुळे, मालगुंडसह पाच गावांतील जमिनींच्या मोजणीत फेरफार केल्याचा आरोप; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे पेन्शन बंद करण्याची मागणी

परवान्याशिवाय जमिनींची खासगी मोजणी करत असल्याचा दावा; शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रार

*रत्नागिरी : *रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, पानवल, मालगुंड, भंडारपुळे आणि निवेंडी आदी परिसरातील जमिनींची चुकीची मोजणी करून हद्दीत बेकायदेशीर फेरफार केल्याचा गंभीर आरोप भूमिअभिलेख विभागाच्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर करण्यात आला आहे. या मनमानी कारभारामुळे स्थानिक शेतकरी आणि बागायतदारांमध्ये मोठे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित कर्मचाऱ्याचे निवृत्तिवेतन (पेन्शन) तातडीने बंद करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे शेतकरी चंद्रकांत ठावरे व पंढरीनाथ पवार यांनी सांगितले आहे.

परवान्याशिवाय खासगी मोजणी आणि भूकरमापकांवर दबावाचा आरोप :

शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार, भूमिअभिलेख विभागातून निवृत्त झालेला संबंधित कर्मचारी कोणताही अधिकृत परवाना नसताना सर्रासपणे खासगी जमिनींची मोजणी करत आहे. एवढेच नव्हे, तर शासकीय मोजणी सुरू असताना प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून तेथील अधिकृत भूकरमापकांवर (सर्व्हेअर) दबाव आणण्याचा प्रयत्नही त्याच्याकडून केला जात आहे. या प्रकारामुळे जमिनींच्या मूळ सीमा आणि हद्दींमध्ये बदल होऊन शेतकऱ्यांमध्ये आपापसांत वाद निर्माण होत आहेत.

Arihant 1

जिल्हाधिकारी व भूमिअभिलेख अधीक्षकांकडे कारवाईची मागणी :

संबंधित निवृत्त कर्मचाऱ्याच्या या गैरकृत्यामुळे अनेक खातेदारांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी तसेच भूमिअभिलेख अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचे निवृत्तिवेतन रोखावे, अशी ठाम मागणी चंद्रकांत ठावरे व पंढरीनाथ पवार यांनी केली आहे.