मजगावच्या तरुणांच्या धाडसाने मृतदेह काढला बाहेर; रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
Santosh Ambekar (वय ४७, रा. भावेआडोम गावडे गोरीवलेवाडी, रत्नागिरी) असे विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तालुक्यातील भावेआडोम गावडे गोरीवलेवाडी परिसरातील भुताचे कातळ येथे रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक पातळीवर अडचण निर्माण झालेली असताना, माजी सरपंचांच्या संपर्कानंतर मजगाव येथील तरुणांनी दाखवलेल्या धाडसामुळे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
चप्पल आणि लाकडी काठीवरून लागला शोध
रविवारी सायंकाळच्या सुमारास संकेत संजय कारकर हे भुताचे कातळ येथील विहिरीवरून जात असताना, त्यांना काठावर बेवारस स्थितीत चप्पल आणि लाकडी काठी दिसून आली. संशय आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता एका व्यक्तीचे शव पाण्यावर तरंगताना दिसले. संकेत यांनी तत्काळ वाडीतील ग्रामस्थांना बोलावून घेतले.
पाण्यातील कपड्यांवरून ग्रामस्थांनी हे शव गावातील संतोष आंबेकर यांचे असावे असा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर त्यांचे सुपुत्र दुर्वेश संतोष आंबेकर यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. विहिरीबाहेरील वस्तू आणि कपड्यांवरून त्यांनी ते शव आपल्या वडिलांचेच असल्याची खात्री केली.

मजगावच्या तरुणांचे धाडस अन् जीवाची पर्वा न करता मदत
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील माने यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. मात्र, विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी सुरुवातीला कोणीही पुढे येत नव्हते. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दांडे आडोमचे माजी सरपंच कैलास तांबे यांनी मजगावचे माजी सरपंच फैयाज मुकादम यांच्याशी संपर्क साधला. फैयाज मुकादम यांच्या सूचनेनुसार हरीश पोमेटकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
माहिती मिळताच मजगाव येथील खालील तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली:
हरीश पोमेटकर व गफूर काझी: दोरीच्या साहाय्याने थेट विहिरीत उतरून मृतदेह बांधण्याचे कठीण काम केले.
झियान मुकादम: विहिरीबाहेरून सहकार्य करत मृतदेह सुखरूप बाहेर काढण्यासाठी मोलाची मदत केली.
या तिघांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश आले. यापूर्वीही मुकी जनावरे सुखरूप बाहेर काढणे आणि विषारी सर्प पकडून निसर्गात सोडणे यांसारखी सामाजिक कामे विनामूल्य करणाऱ्या या तरुणांचे पोलीस प्रशासन व ग्रामस्थांनी आभार मानले.
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
मृतदेह विहिरीबाहेर काढल्यानंतर पोलिसांनी रीतसर पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून संतोष आंबेकर यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बीएनएसएस १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ९६/२०२६ अशी नोंद केली असून, पोलीस ठाण्याच्या पथकाकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.













