तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीच्या सचिवपदी; विद्यार्थ्यांचे आंदोलन तूर्तास स्थगित, मंत्री शिवेंद्रराजेंची घोषणा
Vivek Bhimanwar (अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग) यांना पेपरफुटी प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. MPSC पेपरफुटी प्रकरणात अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी गेल्या ११ दिवसांपासून पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. अखेर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत विवेक भीमनवार पदावर राहणार नाहीत
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा निर्णय विद्यार्थ्यांसमोर मांडला. पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी पूर्ण होईपर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार हे त्या पदावर कार्यरत असणार नाहीत. सरकारनं त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
या निर्णयावर भाष्य करताना विवेक भीमनवार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला माझे नेहमीच प्राधान्य राहिले आहे."

तुकाराम मुंढे MPSC समितीच्या सचिवपदी नियुक्त
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडका काढताना मंत्री शिवेंद्रराजेंनी आणखी एक मोठी घोषणा केली. एमपीएससीच्या चौकशी समितीच्या सचिवपदी धडाडीचे आणि कडक शिस्तीचे अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील आणि पेपरफुटी प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही मंत्र्यांनी दिले.
तत्पूर्वी, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते. मंत्री शिवेंद्रराजेंनी आणलेल्या मसुद्यामध्ये सुरुवातीला अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र, त्यानंतर सरकारने भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आंदोलनाला मोठे यश आले आहे.













