Nanar Tragedy: राजापुरात भीषण दुर्घटना: खाडीत कालवे काढताना एकाच कुटुंबातील ४ मुलांचा बुडून मृत्यू; नाणार परिसरावर शोककळा

Nanar Tragedy: राजापुरात भीषण दुर्घटना: खाडीत कालवे काढताना एकाच कुटुंबातील ४ मुलांचा बुडून मृत्यू; नाणार परिसरावर शोककळा

नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Nanar Tragedy (नाणार, तालुका राजापूर) येथे रविवारी दुपारच्या सुमारास काळीज पिळवटून टाकणारी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नाणार इंगळवाडी येथे खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी आई-वडिलांसमवेत गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच भावंडांपैकी चार मुलांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत एका लहान मुलीला सुदैवाने वाचवण्यात यश आले असले, तरी तिघांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला असून एका मुलीचा शोध अद्याप सुरू आहे. या भीषण दुर्घटनेने संपूर्ण राजापूर तालुक्यासह नाणार पंचक्रोशीत तीव्र शोककळा पसरली आहे.

*पाण्याच्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना
*मिळालेल्या माहितीनुसार, इंगळवाडी येथील जुनेद भाटकर व त्यांच्या पत्नी हिना भाटकर हे आपल्या मुलांसह रविवारी (११ ऑक्टोबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कालवे आणि मुळे काढण्यासाठी गावातील खाडीपात्रात गेले होते. आई-वडील कामात मग्न असताना, दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पाण्यातील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे पाचही मुले अचानक पाण्याच्या प्रवाहाकडे ओढली गेली.

मुलांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर पालकांनी तातडीने धाव घेऊन त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. यामध्ये एका लहान मुलीला वेळीच बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला, मात्र उर्वरित चार भावंडे खोल पाण्याच्या डोहात बुडाली.

Tata SUV

चार निष्पाप भावंडांवर काळाची झडप
या भीषण दुर्घटनेत भाटकर कुटुंबातील खालील चार निष्पाप भावंडांचा दुर्दैवी अंत झाला:

मोहम्मद जुनेद भाटकर (वय ६ वर्षे)

जुहेरिया जुनेद भाटकर (वय ९ वर्षे)

बुशिरा जुनेद भाटकर (वय ११ वर्षे)

माहिरा जुनेद भाटकर (वय १५ वर्षे)

घटनेचे वृत्त समजताच नाटे सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

स्थानिक मच्छीमार व पोलिसांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम
स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांच्या मदतीने खाडीच्या खोल पाण्यात युद्धपातळीवर शोधमोहीम राबवण्यात आली. या शोधकार्यादरम्यान मोहम्मद, जुहेरिया आणि बुशिरा या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले, तर पंधरा वर्षीय माहिरा हिचा शोध सायंकाळपर्यंत सुरू होता.

एकाच वेळी चार निष्पाप मुलांचा असा करुण अंत झाल्यामुळे भाटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी नाटे सागरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.