Madhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचे निधन

Madhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचे निधन

वयाच्या ७३ व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास; पक्षाघाताच्या दीर्घ आजाराशी सुरू होती झुंज

Madhu Kambikar (ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर) यांचे पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या प्रकृतीच्या अस्वस्थतेशी आणि आजाराशी झुंज देत होत्या, मात्र अखेर त्यांची आजारपणाशी सुरू असलेली झुंज संपली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण मराठी सिनेसृष्टीत आणि लावणी क्षेत्रात दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

तमाशाच्या फडातून रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास
२८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे मधु कांबीकर यांचा जन्म झाला होता. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात तमाशाच्या फडातून झाली होती. तमाशानंतर त्यांनी अत्यंत यशस्वीपणे रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवले. चित्रपट, लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी ते दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला.

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ या चित्रपटातून मधु कांबीकर यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली. याशिवाय ‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’ आणि ‘येऊ का घरात’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. विशेषतः आई आणि सासूच्या विविध छटा त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने जिवंत केल्या होत्या.

Shiva optical

एका रात्रीने बदलले आयुष्य: रंगमंचावरील तो प्रसंग
मराठी सिनेसृष्टीत आपल्या लावणीने आणि कसदार অভিনयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मधु कांबीकर यांच्या आयुष्यात २७ नोव्हेंबर २०१६ रोजी अत्यंत वेदनादायी घटना घडली. मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमात त्यांनी तब्बल १२ वर्षांनंतर स्टेजवर नृत्य सादर केले होते.

नृत्य सादर करत असतानाच त्यांची प्रकृती खालावली आणि अस्वस्थ वाटू लागले. मात्र, कलेवरील निष्ठेपोटी त्यांनी नृत्य थांबवले नाही आणि जिद्दीने सादरीकरण पूर्ण केले. त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यावर त्यांना तीव्र पक्षाघाताचा (पॅरालिसिस) झटका आला आणि त्यांचा उजवा हात बधीर झाला. या आजारपणामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आणि तेव्हापासून त्या अभिनय क्षेत्रापासून दूर व अंथरुणाला खिळल्या होत्या.

कलेच्या क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी २०१८ मध्ये त्यांना ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र, प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्या हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. त्यांच्या वतीने त्यांची सून शीतल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. त्यांच्या निधनाने मराठी लोककला आणि चित्रपटसृष्टीतील एक तेजस्वी तारा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.