अज्ञात चोरट्याविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू
Sangameshwar Mobile Theft: (संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी) येथील एसटी स्थानक परिसरातून एका प्रवाशाचा सुमारे ६४ हजार रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा (iPhone 15) मोबाईल चोरीला गेल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित प्रवाशाच्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*नेमकी घटना कशी घडली?
*पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रेषिम दिनकर साटम (वय ५४, सध्या रा. बोरिवली, मुंबई) हे ९ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास मुंबईहून रत्नागिरीकडे येण्यासाठी एसटी बसने निघाले होते. प्रवासादरम्यान १० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बस संगमेश्वर एसटी स्थानक परिसरात पोहोचली असता, साटम यांना आपला मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले.
त्यांनी तात्काळ आसपासच्या परिसरात व बसमध्ये शोध घेतला, मात्र मोबाईल मिळून आला नाही. कोणा अज्ञात व्यक्तीने लबाडीच्या उद्देशाने प्रवासाचा आणि गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरून नेल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी संगमेश्वर पोलिसांत धाव घेतली.

६४ हजार रुपयांचा आयफोन लांबवला
चोरीस गेलेला मोबाईल ॲपल कंपनीचा निळ्या रंगाचा iPhone 15 मॉडेल असून, त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत सुमारे ६४ हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी रेषिम साटम यांच्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५(क) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून एसटी स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर यंत्रणांच्या साहाय्याने चोरट्या शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.













