सुप्रीम कोर्टावर काढण्यात येणाऱ्या मोर्चावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; सुधीर मुनगंटीवारांचाही काँग्रेसवर हल्लाबोल
Devendra Fadnavis on INDIA Alliance Protest: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या वतीने थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चानंतर भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांची भेट घेऊन निवेदन देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. मात्र, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ही भेटीची मागणी फेटाळून लावत कायदेशीर मार्गाने न्यायालयात याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला. सरन्यायाधीशांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या या भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली आहे.
"काँग्रेसचा संविधानावर विश्वास उरलेला नाही" – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "तुम्ही एकीकडे संविधानाच्या बाता करता, मात्र सरन्यायाधीशांकडे मोर्चा घेऊन जाण्याची मागणी कोणत्या संविधानात लिहिली आहे? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कधी अशा कोणत्याही राजकीय मोर्चाला सामोरे जातात का? त्यामुळे सरन्यायाधीशांनी दिलेला निर्णय पूर्णपणे योग्य आहे. तुम्हाला कायदेशीर मार्गाने लढायचे असेल, तर न्यायालयात जाऊन याचिका दाखल करा."
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की, विरोधकांचा संविधानावर आणि घटनात्मक संस्थांवर विश्वास राहिलेला नाही. सरन्यायाधीशांनी आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून भेटीस नकार दिला आहे. मात्र, विरोधी पक्ष सरन्यायाधीशांवर टीका करून आणि घटनात्मक संस्थांवरील लोकांचा विश्वास उडवून देण्यासाठी मोठे षडयंत्र आखत असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

निवडणुकीतील पराभवाचे कारण शोधण्यासाठी मोर्चा – सुधीर मुनगंटीवार
दुसरीकडे, भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील ‘इंडिया’ आघाडीच्या मोर्चावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "काँग्रेस आणि विरोधी पक्ष जर देशापुढील समस्यांवर, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर किंवा देशाच्या सुरक्षेवर आंदोलन करणार असतील तर ते समजू शकते. मात्र, प्रत्येक निवडणुकीत होणाऱ्या पराभवाचे खापर फोडण्यासाठी आणि कारणे शोधण्यासाठी असा मोर्चा काढणे पूर्णपणे अयोग्य आहे."
काँग्रेसने देशातील सर्वच घटनात्मक संस्थांना शंकास्पद बनवून ठेवले असल्याचे सांगत मुनगंटीवार पुढे म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे एकटे काम करत नसून त्यांच्यासोबत देशभरातील, महाराष्ट्रातील व कर्नाटकातील लाखो कर्मचारी रात्रं-दिवस काम करतात. हे सर्व कर्मचारी निष्पक्ष नाहीत असे म्हणणे अत्यंत चुकीचे आणि बेजबाबदारपणाचे आहे.













