क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून बेदरकारपणे गाडी चालवल्याने अपघात; शहर पोलिसांकडून मृत चालकाविरुद्धच गुन्हा दाखल
Ratnagiri Lighthouse Accident: (रत्नागिरी) शहरातील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या लाइट हाऊस ते हनुमान स्टॉप (किल्ला) दरम्यानच्या तीव्र उताराच्या रस्त्यावर भरधाव अॅक्टिव्हा दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा अखेर उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. प्रेम भिम ओड (वय ३०, मूळ रा. पिपळकंटागाव, ता. बडीकेदार-३, जि. डोटी, पश्चिम नेपाळ; सध्या रा. गोडावून स्टॉपजवळ, कोहीनूर सोसायटी, रत्नागिरी) असे मृत चालकाचे नाव आहे.
रस्त्याच्या परिस्थितीचे गांभाैर्य न बाळगता, हयगयीने आणि निष्काळजीपणाने दुचाकी चालवून स्वतःच्या मृत्यूस तसेच पत्नी, मेहुणी व लहान मुलांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी मृत चालकाविरुद्धच अपघाताचा गुन्हा नोंदवला आहे.
*एकाच दुचाकीवर पाच जण; तीव्र उतारावर ताबा सुटला
*प्राप्त माहितीनुसार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रेम ओड हे आपल्या ताब्यातील अॅक्टिव्हा दुचाकीवरून (क्रमांक MH 08 AA 0226) पत्नी कोमल, मेहुणी हिमा शेर ओढ आणि तिची दोन लहान मुले अशा एकूण पाच जणांना बसवून लाइट हाऊस ते हनुमान स्टॉप दरम्यानच्या तीव्र उतारावरून जात होते.

एकाच दुचाकीवरून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करत असताना तीव्र उतारावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी प्रचंड वेगाने घसरून भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत प्रेम ओड यांच्यासह दुचाकीवरील इतर सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले.
*उपचारादरम्यान मृत्यू आणि कायदेशीर कारवाई
*अपघातानंतर जखमींना तातडीने रत्नागिरीतील शासकीय जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारांसाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता प्रेम ओड यांची प्राणज्योत मालवली.
शुरुवातीला सावर्डे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर तपासाची कागदपत्रे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बाळ रमेश पालकर यांनी केलेल्या सखोल तपासात, मृत चालकाने रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळेच हा अपघात घडल्याचे निष्पन्न झाले.
हवालदार पालकर यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी मृत चालक प्रेम भिम ओड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(अ) आणि १२५(ब) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.













