Sangameshwar Theft News : घाटीवळे आणि करंजारीत एकाच रात्री पाच घरे फोडली

Sangameshwar Theft News : घाटीवळे आणि करंजारीत एकाच रात्री पाच घरे फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घरांचे कुलूप तोडून पोबारा, पोलिसांत माहिती दाखल

Sangameshwar Theft News : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील घाटीवळे आणि करंजारी परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत तब्बल पाच घरे फोडल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे दोन्ही गावांत भीतीचे सावट पसरले आहे. घाटीवळे गावातील मुसलमान वाडी येथील अब्दुल रहमान फोडकर, इकबाल उमर फोडकर आणि अब्दुल मज्जिद शिरगावकर या तिघांच्या बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी आतील ऐवज लंपास केला.

घाटीवळे येथे चोरी केल्यानंतर करंजारीत मोर्चा
घाटीवळे येथे हातसफाई केल्यानंतर चोरट्यांनी तेथून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गालगत वसलेल्या करंजारी गावावर मोर्चा वळवला. महामार्गाला लागूनच असलेल्या चंद्रकांत शिवराम भुर्के यांच्या बंद घरावर तसेच बाबा वळंजु यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. बाबा वळंजु हे कामानिमित्त बाहेर गेले असताना चोरट्यांनी संधी साधून घरात प्रवेश केला. या दोन्ही ठिकाणांहून सुमारे बावन्न हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांची नवी शक्कल
बाबा वळंजु यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी केल्यानंतर, चोरट्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या आणि कोणाला संशय येऊ नये या हेतूने त्याच कडी-कोंड्याला स्वतःचे दुसरे कुलूप ठोकून तेथून पोबारा केला. महामार्गालगतच्या घरांवर अशा प्रकारे धाडसी चोऱ्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

Arihant 3

पोलिसांत माहिती दाखल; गस्त वाढवण्याची मागणी
या संपूर्ण घटनेची रीतसर माहिती साखरपा पोलिसांना देण्यात आली असून, या प्रकारामुळे घाटीवळे आणि करंजारी परिसरात घबराट पसरली आहे. पोलिसांनी या भागात तातडीने गस्त वाढवून संशयित चोरट्यांचा छडा लावावा, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.