२,४९० केंद्रांवर शांततेत पार पडली परीक्षा; १२,९४६ महिला तर ४,६१२ पुरुषांनी गिरवले साक्षरतेचे धडे
Navbharat Literacy Exam : केंद्रपुरस्कृत ‘उल्लास – नवभारत साक्षरता’ अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात नुकतीच साक्षरता परीक्षा उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील २ हजार ४९० परीक्षा केंद्रांवर पार पडलेल्या या परीक्षेत तब्बल १७ हजार ५५८ निरक्षर आजी-आजोबांनी सहभाग नोंदवून साक्षरतेची परीक्षा दिली. जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये पार पडलेल्या या परीक्षेला परीक्षार्थींनी मोठी उपस्थिती दर्शवली असून, ७२२ जण अनुपस्थित राहिले. ही संपूर्ण परीक्षा अत्यंत शांततेत व उत्साही वातावरणात पार पडल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
महिलांचा सर्वाधिक सहभाग; साक्षरतेला मिळाली नवी चालना
निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्याच्या मुख्य उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या अभियानातून रत्नागिरी जिल्ह्यात साक्षरतेला मोठी चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या परीक्षेत पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग सर्वाधिक दिसून आला. जिल्ह्यातून १२ हजार ९४६ महिला तर ४ हजार ६१२ पुरुषांनी सहभाग नोंदवत परीक्षेत यश मिळवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले. जिल्ह्यातील चिपळूण, दापोली, गुहागर, खेड, लांजा, मंडणगड, राजापूर, रत्नागिरी आणि संगमेश्वर या सर्व नऊ तालुक्यांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
तीन माध्यमांतून झाली परीक्षा; वाचन व अंकज्ञानावर भर
या परीक्षेसाठी मराठी माध्यमातून १५ हजार ५५४, उर्दू माध्यमातून १ हजार, तर इंग्रजी माध्यमातून ४ अशा तिन्ही माध्यमांतून एकूण १७ हजार ५५८ परीक्षार्थींनी सहभाग घेतला. नवभारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून निरक्षर व्यक्तींना मूलभूत वाचन, लेखन आणि प्राथमिक अंकज्ञानाचे धडे देऊन त्यांना साक्षर करण्यावर विशेष भर दिला जात आहे. या परीक्षेमुळे जिल्ह्यातील साक्षरता अभियानातील प्रगतीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यास मोठी मदत होणार आहे.

‘परीक्षा शांततेत व उत्साहात पार पडली’
केंद्रपुरस्कृत उल्लास – नवभारत साक्षरता परीक्षेचे आयोजन जिल्ह्यातील २ हजार ४९० केंद्रांवर करण्यात आले होते. ही परीक्षा शांततेत व उत्साहात पार पडली असून, १७ हजार ५५८ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. यात सर्वाधिक संख्या महिलांची होती. मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमातून ही परीक्षा पार पडली, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार यांनी दिली.
तालुकानिहाय उपस्थित परीक्षार्थींची आकडेवारी:
चिपळूण : महिला १९७३, पुरुष ६५८ (एकूण २६३१)
दापोली : महिला १८३७, पुरुष १२२५ (एकूण ३०६२)
गुहागर : महिला १३९६, पुरुष १६६ (एकूण १५६२)
खेड : महिला १२७२, पुरुष ५४६ (एकूण १८१८)
लांजा : महिला १०९५, पुरुष ३८७ (एकूण १४८२)
मंडणगड : महिला ४७८, पुरुष ८५ (एकूण ५६३)
राजापूर : महिला १७१७, पुरुष ३६३ (एकूण २०८०)
रत्नागिरी : महिला १६४६, पुरुष १९९ (एकूण १८४५)
संगमेश्वर : महिला १५३२, पुरुष ९८३ (एकूण २५१५)
एकूण : महिला १२९४६, पुरुष ४६१२ (एकूण १७५५८)













