रत्नागिरीतील काँग्रेस भवनात पत्रकार परिषद; लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन
Congress Protest Against BJP : धर्माचे आणि जातीपातीचे राजकारण करून आता निवडणुका जिंकता येणार नाहीत हे भाजपच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून मतचोरीचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हा निरीक्षक तथा कर्नाटकच्या माजी आमदार सौम्या रेड्डी यांनी केला आहे. देशात लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली येत्या १ नोव्हेंबरला दिल्लीत जोरदार आंदोलन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १ नोव्हेंबरला दिल्लीत एल्गार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सौम्या रेड्डी या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या प्रसंगी रत्नागिरी शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेला राजापूरच्या नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे, काँग्रेस उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, काँग्रेस दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जमीर खलिफे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा व तालुका पातळीवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
‘निवडणूक आयोगाच्या कारभारात सरकारचा हस्तक्षेप’
पत्रकार परिषदेत बोलताना सौम्या रेड्डी यांनी सांगितले की, मतदान हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे आणि निवडणुका अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाल्या तरच देशात लोकशाही टिकून राहील. मात्र, सध्याचे सत्ताधारी सरकार निवडणुकांमध्ये उघडपणे मतचोरी करत आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करताना पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान यांचा समावेश असायचा. मात्र, सरकारने नवीन कायदा करून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना या प्रक्रियेतून बाजूला केले आणि एका मंत्र्याचा समावेश केला. त्यामुळे सरकार निवडणूक विभागाच्या कामकाजात थेट हस्तक्षेप करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

महाराष्ट्राच्या निवडणुकीत ३९ लाख मतांचा घोळ
महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे मतचोरी झाली हे सर्वांनी पाहिले आहे. एकट्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत ३९ लाख मतांचा घोळ घातला गेला, असा आरोप रेड्डी यांनी केला. सध्या एसआयआरच्या (SIR) माध्यमातून दलित व आदिवासी बांधवांची मते कमी करण्याचा घाट घातला जात असून, लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम सरकार करत असल्याचे त्यांनी नमूद केले. १ नोव्हेंबरला दिल्लीत होणाऱ्या मुख्य आंदोलनासोबतच जिल्हा व तालुका स्तरावरही या ‘मतचोरी’विरोधात तीव्र आंदोलने छेडली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.













