Ratnagiri Water Tax Hik : रत्नागिरीकरांवर पाणीपट्टीवाढीचा बोजा; उत्पन्नाच्या अडीचपट खर्चामुळे नगर परिषदेकडून दरवाढीची तयारी

Ratnagiri Water Tax Hik : रत्नागिरीकरांवर पाणीपट्टीवाढीचा बोजा; उत्पन्नाच्या अडीचपट खर्चामुळे नगर परिषदेकडून दरवाढीची तयारी

वार्षिक खर्च ९ कोटींवर; १५ वर्षांनंतर पाण्याच्या वापरानुसार बिल आकारण्याची योजना

Ratnagiri Water Tax Hik : रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा वार्षिक खर्च तब्बल ९ कोटी रुपयांवर पोहोचला असून, पाणीपट्टीपासून मिळणारे उत्पन्न या खर्चाच्या तुलनेत अडीचपट कमी आहे. त्यामुळे तोट्यात चालणारी पाणीपुरवठा योजना ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर आणण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून पाणीपट्टीचे दर वाढवण्याची तयारी सुरू झाली आहे. सुमारे १५ वर्षांपासून पाणीपट्टीचे दर सुधारित झाले नसताना, आता पाण्याच्या वापरानुसार बिल आकारण्याच्या शासन निर्देशांचीही अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरवासीयांच्या खिशावर पाणीपट्टी वाढीचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अडीचपट खर्चामुळे योजनेचा आर्थिक ताळमेळ बिघडला
रत्नागिरी शहरात घरगुती, व्यावसायिक आणि शहराबाहेरील मिळून १२ हजारांहून अधिक नळजोडण्या आहेत. घरगुती वापरासाठी सध्या दरमहा १५० रुपये पाणीपट्टी आकारली जाते, तर व्यावसायिक व शहराबाहेरील जोडण्यांसाठी त्याहून अधिक दर आहेत. मात्र, हे दर सुमारे १५ वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आले होते आणि त्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. पाणीपुरवठा योजनेतील यंत्रणांची देखभाल-दुरुस्ती, पंप आणि पंपहाऊसचा खर्च, वीजबिले, जंतुनाशके, जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच पाणी विभागातील कर्मचाऱ्यांचा आस्थापना खर्च मिळून दरवर्षी सुमारे ९ कोटी रुपये खर्च होतात. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न अत्यल्प असल्याने योजनेची आर्थिक घडी विस्कटली आहे.

आता नळजोडणीच्या व्यासाऐवजी वापरानुसार आकारणार बिल
सध्या नळजोडणीधारकांकडून ठराविक रक्कम पाणीपट्टी म्हणून घेतली जाते. मात्र, शासनाच्या निर्देशांनुसार आता प्रत्यक्ष पाणीवापराच्या प्रमाणात बिल निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे. यामध्ये नळजोडणीच्या व्यासाऐवजी प्रत्यक्ष किती पाणी वापरले जाते, याला महत्त्व दिले जाणार आहे. या नव्या पद्धतीमुळे कमी पाणी वापरणाऱ्यांना दिलासा मिळणार असून, अधिक पाणी वापरणाऱ्यांना त्यांच्या वापरावर आधारित सुधारित बिल द्यावे लागणार आहे.

Shanti real estate 1

अनधिकृत नळजोडण्या शोधण्याची मोहीम सुरू
दरम्यान, रत्नागिरी शहरातील अनधिकृत नळजोडण्या शोधण्याची मोहीमही नगर परिषदेने हाती घेतली आहे. अशा अनधिकृत जोडण्या आढळल्यास दंडात्मक पाणीपट्टी वसूल करून त्या अधिकृत करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. पाणीपट्टीच्या या सुधारित दराबाबत सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाल्यानंतरच प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे पाणीपट्टीत नक्की किती दरवाढ होणार आणि ती कधीपासून लागू होणार, याकडे संपूर्ण रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.