माळेश्वर ते बोंड्ये परिसरात जलप्रदूषणाची चिंता; प्रशासनाने तातडीने पाहणी करून कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
*देवरुख *: Bavandhi River Pollution News संदर्भात संगमेश्वर तालुक्यातील बावनदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. माळेश्वर ते बोंड्ये दरम्यान नदीचे पाणी दूषित झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, मासेमारीसाठी काही व्यक्तींकडून रासायनिक पदार्ंचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाण्याच्या सुरक्षिततेसह नदीतील जलचरांच्या अस्तित्वाबद्दलही मोठी चिंता व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने पाण्याची तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची गरज असताना एकमेव जलस्रोतच दूषित होत असल्याची बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. माळेश्वर ते बोंड्ये या नदीपात्रातील काही ठिकाणी पाणी दूषित झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. मासे पकडण्यासाठी काही व्यक्तींकडून रासायनिक पदार्थाचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त होत असला, तरी पाणी दूषित होण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे नदीच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून प्रदूषणाचे मूळ शोधणे आवश्यक आहे. रासायनिक पदार्थाचा वापर होत असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
प्रशासनाने तातडीने पाहणी करावी

नदीचे पाणी दूषित झाल्याने जलचरांवरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचे नमुने तपासावेत, प्रदूण्यास जबाबदार असणाऱ्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी बोंड्येच्या माजी सरपंच ललिता गुडेकर यांनी केली आहे. पाणीटंचाईच्या काळात बावनदीसारख्या महत्त्वाच्या जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन किती तत्परतेने पावले उचलते, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.













