Sonia Gandhi Memoir Release: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ आत्मचरित्राची चर्चा; १० नोव्हेंबरला होणार पुस्तक प्रकाशित

Sonia Gandhi Memoir Release: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' आत्मचरित्राची चर्चा; १० नोव्हेंबरला होणार पुस्तक प्रकाशित

राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत अशी कधीच इच्छा नव्हती; सोनिया गांधींचा व्हिडिओ संदेशातून मोठा खुलासा

*नवी दिल्ली *: Sonia Gandhi Memoir Release च्या संदर्भात काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या आगामी ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकाबाबत मोठा खुलासा केला आहे. आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि खाजगी क्षण या पुस्तकात मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, आपल्या पती व दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हे पंतप्रधान व्हावेत, अशी आपली कधीच इच्छा नव्हती, असा महत्त्वपूर्ण खुलासा त्यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे केला आहे.

नुकतेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर आपले नवीन अधिकृत हँडल सुरू केल्यानंतर, सोनिया गांधी यांनी एक विशेष व्हिडिओ पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आगामी १० नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणाऱ्या आपल्या पुस्तकाबद्दल सविस्तर भाष्य केले आहे. इतरांनी आपल्याबद्दल अनेक दशकांपासून विविध गोष्टी लिहिल्या आहेत, त्यातील बऱ्याच गोष्टी बनावट किंवा अतिशयोक्तीपूर्ण होत्या; त्यामुळे आता आपण स्वतः जशा घडल्या तशा घटना आणि तथ्ये मांडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"ही माझी बाजू नाही, ही माझी कथा आहे"
पुस्तकाच्या प्रकाशनाबाबत बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, हे पुस्तक समोर आल्यानंतर काही प्रमाणात वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. "मी याला माझी बाजू मांडणे म्हणणार नाही, तर ही माझी स्वतःची कथा आहे," असे त्यांनी नमूद केले. लोकांचे आपल्याबद्दलचे दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात, काहींचे मत बदलू शकेल तर काहींचे वाईटही वाटू शकेल, मात्र सार्वजनिक जीवनात असताना हे स्वाभाविक असल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले.

Radhakrushna patapedhi

केंब्रिजमधील ग्रीक रेस्टॉरंटपासून सुरू झाली प्रेमकथा
आपल्या पोस्टमध्ये सोनिया गांधी यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीची आणि त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या सुरवातीची अत्यंत रोमँटिक आठवणही शेअर केली आहे. आपली प्रेमकथा केंब्रिजमधील एका छोट्याशा ग्रीक रेस्टॉरंटमध्ये सुरू झाली होती, असे सांगत त्यांनी राजीवजींसोबत प्रेम, हास्य आणि सुंदर आठवणींनी भरलेले एक वेगळेच विश्व निर्माण केल्याचे सांगितले. हेच सुंदर जग आगामी १० नोव्हेंबर रोजी ते वाचकांसोबत पुस्तक रूपाने शेअर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.