स्मार्ट सिटी प्रकल्पातील बस थांब्यांना मिळणार नवीन ओळख
*रत्नागिरी *: Ratnagiri Bus Stop Naming Decision संदर्भात रत्नागिरी शहरात स्मार्ट सिटी आणि पथदर्शी प्रकल्पांतर्गत एकूण १४ आधुनिक व आकर्षक बस थांब्यांचा विकास करण्यात आला आहे. यापैकी १२ नवीन बस थांब्यांचे अधिकृत नामकरण गुरुवारी होणाऱ्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केले जाणार आहे. यापूर्वी स्थायी समितीच्या मंजुरीनुसार शिवाजीनगर येथील दोन बस थांब्यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज बस थांबा’ असे नामकरण करण्यात आले होते.
नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या या नवीन १२ बस थांब्यांमध्ये मारुती मंदिर चौक, नाचणे पॉवरहाऊस, नाचणे-नारायणमळी रोड, आरोग्य मंदिर, आयटीआय, मारुती मंदिर-नाचणे रोड, समर्थ भांडार, नवकार प्लाझा समोर, आरोग्य मंदिर रिक्षा स्टॉपजवळ, माळनाका व्यायामशाळा, जिल्हा परिषद कमानीजवळ आणि नगर परिषदेसमोरील नवीन बस थांब्यांचा समावेश आहे.
भाजी मंडईच्या नूतन इमारतीचे नामकरण

दुसरीकडे, शहरातील बाजारपेठ येथील जुन्या भाजी मार्केटच्या नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन नुकताच तिचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे आणि ती इमारत नगर परिषदेच्या ताब्यात आली आहे. या नूतन भाजी मंडई इमारतीला ‘श्री नवलाई देवी जुनी भाजी मंडई’ असे नाव देण्यात यावे, अशी अधिकृत मागणी सभापती विजय खेडेकर आणि नगरसेविका सायली विकास पाटील यांनी केली आहे.
गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शहरातील १२ नवीन बस थांब्यांसह या भाजी मंडईच्या इमारतीला नवीन नाव देण्याबाबतचा ठराव अधिकृतपणे मंजूर केला जाणार आहे.













