एकाच आठवड्यात ५ अपघात, वर्षाभरात ९ जणांचा बळी; राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर
रत्नागिरी : Mumbai Goa Highway Anjanari Accident संदर्भात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील आंजणारी पूल आणि घाट परिसर सध्या अपघातांचे मुख्य केंद्र (ब्लॅक स्पॉट) बनला आहे. येथील धोकादायक परिस्थिती लक्षात घेता तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्यास स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.
आंजणारी बसथांबा ते आंजणारी पूल या दरम्यान वारंवार होणाऱ्या प्राणघातक अपघातांना आळा घालण्यासाठी तातडीने सुरक्षात्मक पावले उचलावीत, असे विनायक राऊत यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे. या संदर्भात राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना एक विस्तृत निवेदन देण्यात आले. लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे यांच्या हस्ते हे निवेदन महामार्ग उपविभागाला अधिकृतपणे सादर करण्यात आले.
या प्रसंगी उबाठा पक्षाचे लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे, युवासेना तालुका अधिकारी अभिजित राजेशिर्के, उपविभागप्रमुख राजेंद्र सुर्वे, दामोदर खामकर, दिनेश गुरव आणि विघ्नेश तावडे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

एकाच आठवड्यात ५ अपघात; वर्षभरात ९ जणांनी गमावला जीव
राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिलेल्या निवेदनातून या महामार्गावरील अपघातांचे भयानक आणि वाढते प्रमाण निदर्शनास आणून देण्यात आले आहे. आंजणारी पूल व परिसरात अवघ्या एकाच आठवड्यात तब्बल ५ भीषण अपघात घडले असून, यामध्ये अनेक प्रवासी आणि नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
याशिवाय, गेल्या वर्षभराच्या कालावधीत याच धोकादायक पट्ट्यात विविध अपघातांमध्ये सुमारे ९ जणांना आपला नाहक जीव गमवावा लागल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. वारंवार अपघात होऊनही राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून, आंजणारी घाट व पुलाजवळ गतिरोधक, दिशादर्शक फलक आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना त्वरित न झाल्यास महामार्गावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.













