प्रशासकीय अधिकारी, जलतज्ज्ञ आणि नागरिक एकत्र; आगामी पाणीटंचाई रोखण्यासाठी व्यापक आराखडा तयार करून पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडे सोपवणार
Ratnagiri Water Conservation: रत्नागिरी जिल्ह्यातील भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईची समस्या टाळण्यासाठी आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ‘रत्नागिरी जिल्हा शाश्वत पाणी परिषद’ नुकتतीच उत्साहात पार पडली. रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, हिरवळ प्रतिष्ठान आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या या परिषदेत जलसंधारणाबाबत सखोल मंथन करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून, जलसंवर्धनाच्या उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येण्याचा सूर यावेळी आळवण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती व सहभाग
जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या या परिषदेला विविध क्षेत्रातील दिग्गज व अधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर आमदार प्रमोद जठार यांच्यासह हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, मृद जलसंधार विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय साहुले, जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, तहसीलदार राजाराम म्हात्रे, डॉ. श्रीधर ठाकुरदेसाई आणि दादा दळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय वैशंपायन यांनी केले तर प्रास्ताविक नंदू तांबे यांनी मांडले. परिषदेत मांडण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांचा सविस्तर आराखडा तयार करून तो पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
सांडपाणी व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
परिषदेत मार्गदर्शन करताना डॉ. उमेश मुंडले यांनी गावागावांतील सांडपाण्यामुळे दूषित होणाऱ्या पिण्याच्या विहिरींच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आणला. रत्नागिरी शहरातील फणशी येथे २०१९ मध्ये ‘फ्लोटिंग रिडबेड सिस्टीम’द्वारे बॅक्टेरियल कल्चर आणि वनस्पतींच्या माध्यमातून सांडपाण्यावर यशस्वी प्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचे इस्रायलचे तंत्रज्ञान भारतासाठी अतिशय खर्चिक ठरू शकते, असे स्पष्ट करत त्याऐवजी टप्प्याटप्प्याने पावसाचे पाणी अडवून भूजलपातळी वाढवणे अधिक हिताचे ठरेल, असा सल्ला त्यांनी दिला.

हॉटेल उद्योग आणि नागरिकांसाठी पाणी बचतीचे धडे
दापोलीतील जलतज्ज्ञ डॉ. प्रशांत परांजपे यांनी हॉटेल व घरांमध्ये पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने करण्याचे आवाहन केले. हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना पूर्ण ग्लासाऐवजी अर्धा ग्लास पाणी देणे, सिंकमध्ये पिण्याचे पाणी न ओतणे यांसारख्या सवयी लावण्यावर भर दिला. तसेच, बहुमजली इमारतींमध्ये ‘एसी’तून गळणारे पाणी आणि सांडपाणी साठवून स्वतंत्र पाईपलाईनद्वारे फ्लश किंवा झाडांसाठी पुनर्वापर करण्याचे महत्त्वपूर्ण तंत्र त्यांनी सुचवले. हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनीही आपल्या हॉटेल्समध्ये ग्राहकांना पाऊण ग्लास पाणी देण्याचे नियम लागू केल्याचे सांगत, बाथटबचा वापर टाळण्याचे आवाहन केले.
जलसेवकांचा गौरव व प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी
जलसंधारणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींना याप्रसंगी ‘जलसेवा गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यामध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालय एनएसएस विभाग, अनसूया महिला स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा सौ. नीलम पालव, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे, राहुल तिवरेकर, झेप फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम ढेकणे, डॉ. प्रशांत परांजपे, शहानवाज शहा, फैय्याज मुकादम, डॉ. उमेश मुंडले, निमेश नायर यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान झाला. दरम्यान, चिपळूणचे शहानवाज शहा यांनी, प्रशासनाच्या टंचाई आराखड्यात आणि बैठकांमध्ये गावपातळीवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या ‘जलदूतांना’ व ‘जलप्रेमींना’ निमंत्रित करून त्यांचा सहभाग वाढवावा, अशी आग्रही मागणी केली.













