Machal ST Bus Service: माचाळ गावात अखेर एसटी बस दाखल, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

Machal ST Bus Service: माचाळ गावात अखेर एसटी बस दाखल, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

ग्रामस्थांकडून ढोल-ताशांच्या गजरात स्वागत; विद्यार्थ्यांची पायपीट थांबली

माचाळ, ०२ नोव्हेंबर – कोकणातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या माचाळ परिसरात प्रवाशांची वाहतुकीअभावी होत असलेली गैरसोय आणि विद्यार्थ्यांना करावा लागणारा त्रास अखेर संपला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील माचाळ गावात एसटी बसची बहुप्रतिक्षित सेवा सुरू झाली असून, गावात पहिल्यांदाच लालपरी पोहोचताच ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले. हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी स्थानिकांनी ढोल-ताशांच्या गजरात अभूतपूर्व उत्साहात बसचे स्वागत केले.

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माचाळ परिसरातील नागरिकांना दैनंदिन कामांसाठी आणि प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी होणारे हाल लक्षात घेऊन प्रभानवल्ली पंचायत समिती सदस्य उमेश पत्की यांनी गावात एसटी बस सुरू व्हावी यासाठी गेल्या काही काळापासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

हा मार्ग लवकरात लवकर सुरू करण्यासाठी एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभाग वाहतूक शाखा, लांजा आगाराचे व्यवस्थापक प्रकाश झोरे, ललित आयरे, लांजा स्थानक प्रमुख एस. एस. माळी आणि यशवंत मयेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या संपूर्ण सेवेचे प्रत्यक्ष नियोजन करणाऱ्या साहाय्यक वाहतूक निरीक्षक गणेश कुमार वायदंडे आणि पंचायत समिती सदस्य उमेश पत्की यांचा ग्रामस्थ तसेच लांजा तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

Lok. Tilak hospi.

आमदार किरण सामंत यांच्याकडे सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे माचाळ गावाचा हा प्रश्न मार्गी लागला आहे. या ऐतिहासिक स्वागत सोहळ्याप्रसंगी सभापती सौ. मानसी आंबेकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. विनिता गांगण, लांजा तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपतालुका संघटक चेतन खांदारे यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि माचाळ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बससेवेमुळे ग्रामस्थ, वयोवृद्ध आणि विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांची वर्षानुवर्षांची पायपीट आता कायमची थांबली आहे.