BJP Ratnagiri South: भाजपची आज चिपळूण येथे राष्ट्रचिंतन बैठक

BJP Ratnagiri South: भाजपची आज चिपळूण येथे राष्ट्रचिंतन बैठक

भारतीय जनता पक्षाच्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानांतर्गत महत्त्वाची बैठक

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या विशेष अभियानाचा भाग म्हणून भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याची राष्ट्रचिंतन बैठक मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी चिपळूण येथे आयोजित करण्यात आली आहे.शिक्षक पतपेढी सभागृहात सायंकाळी ५ वाजता पार पडणाऱ्या या बैठकीचे नियोजन जिल्हाध्यक्ष प्रशांत बबन यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार प्रमोद जठार प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. सध्याच्या राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर पक्षाची अधिकृत भूमिका आणि आगामी काळातील संघटनात्मक वाटचालीची रूपरेषा ठरवण्यासाठी ही राष्ट्रचिंतन बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीमध्ये लोकशाहीचे संवर्धन, घटनात्मक मूल्यांचे रक्षण, देशाची अखंडता आणि राष्ट्रीय विचारधारेचा प्रसार या प्रमुख विषयांवर सखोल विचारमंथन केले जाईल. याशिवाय लोकशाही व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित करणे, राष्ट्रहिताचे विचार सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि संघटनात्मक पातळीवर नव्या जोमाने कार्यरत राहण्याबाबत ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांच्याकडून सविस्तर दिशादर्शन केले जाणार आहे.बैठकीस रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले आहे.

Kokan camp