दुर्देवी घटनेने परिसरात शोककळा; संगमेश्वर तालुक्यातील घटना
देवरुख – संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे एका कार्यक्रमासाठी गेलेले कोंड्ये येथील ६६ वर्षीय वृद्ध विश्राम गणपत बारगुडे (रा. कोंड्ये मधलीवाडी, ता. संगमेश्वर) यांचा कार्यक्रम आटोपून परतत असताना वाटेत घडलेल्या हृदयद्रावक घटनेत मृत्यू झाला. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
रिवारी राजाराम देवकड यांच्या गाडीने विश्राम बारगुडे हे एका कार्यक्रमासाठी करजुवे येथे गेले होते. तिथला कार्यक्रम आटोपून ते पुन्हा कोंड्ये येथे परतत असताना, त्यांच्यासोबत पुतणे संदीप गोपाल बारगुडे हेही होते. प्रवासादरम्यान विश्राम बारगुडे हे दुर्गावलेवाडी परिसरात आले असता त्यांनी नैसर्गिक विधिसाठी गाडी थांबवण्याची विनंती केली. गाडी थांबवल्यानंतर ते खाली उतरून रस्त्याच्या बाजूला गेले असता, तिथे त्यांना अचानक एक साप दिसला.
या अनपेक्षित भेटीने ते गाभडले आणि भीतीपोटी जोरात ओरडले… साप, साप. त्यांचा हा आवाज ऐकून पुतण्या संदीप बारगुडे यांनी तात्काळ गाडीतून खाली उतरून धाव घेतली, तोपर्यंत तो साप तिथून निघून गेला. ते कोंड्येच्या दिशेने मार्गस्थ झाले, मात्र तिथून अवघ्या काही अंतर पुढे आल्यावर विश्राम बारगुडे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. क्षणातच ते गाडीत बसलेल्या जागेवरच खाली कोसळले.

अचानक ओढवलेल्या या संकटाने पुतण्यासह सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. पुतण्या संदीप यांनी त्यांना तातडीने नजीकच्या फुगूस आरोग्य केंद्रात नेले, परंतु त्यावेळी फुगूस आरोग्य केंद्र बंद होते. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने हतबल झालेल्या संदीप यांनी त्यांना तात्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, बारगुडे यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.













