मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून २५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि रोकड लंपास; पोलीस तपासाचा वेग वाढवला
रत्नागिरी :
रत्नागिरी शहरानजीक असलेल्या उद्यमनगर परिसरातील एका बंद बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ५४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घरफोडी मंगळवारी (३ नोव्हेंबर) रात्री ९ ते बुधवारी (४ नोव्हेंबर) सकाळी ९ या १२ तासांच्या कालावधीत घडली असून, या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी घरमालक संतोष मधुकर बाष्टे (वय ६०, रा. घरकूल हौसिंग सोसायटी, ‘तीर्थरूप’ बंगला, उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार, बाष्टे यांचे कुटुंब घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांच्या मुख्य दरवाजाचे लॉक उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटाचे कुलूप तोडून आतील १ लाख २५ हजार रुपये किमतीचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रुपये किमतीची ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ५ हजार रुपये किमतीचा चांदीचा कुंकवाचा करंडा आणि रोख ४ हजार ४०० रुपये असा मिळून १ लाख ५४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
बुधवारी सकाळी घरफोडीचा हा प्रकार निदर्शनास येताच बाष्टे यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली व चोरीचा रीतसर पंचनामा केला.

या घरफोडीचा सुगावा लावण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी उद्यमनगर व आसपासच्या परिसरातील मुख्य रस्ते आणि इमारतींवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे. संशयित चोरट्यांचा लवकरात लवकर माग काढण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात असून, स्थानिक गुन्हे शाखेकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास केला जात आहे.













