Devrukh Crime News: वांझोळे बुद्रुक येथे फिल्मी स्टाईलने वृद्ध महिलेची लूट; दिवसाढवळ्या १ लाखाचे मंगळसूत्र लांबवले

Devrukh Crime News: वांझोळे बुद्रुक येथे फिल्मी स्टाईलने वृद्ध महिलेची लूट; दिवसाढवळ्या १ लाखाचे मंगळसूत्र लांबवले

संगमेश्वर तालुक्यात थरारक घटना; मदतीचे सोंग दाखवून भामट्याने साधला डाव

देवरूख :
देवरूख पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या वांझोळे बुद्रुक गवळीवाडी येथे एका भामट्याने अत्यंत चलाखीने आणि फिल्मी स्टाईलने ६७ वर्षीय वृद्ध महिलेला दिवसाढवळ्या लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मदतीचे सोंग दाखवून, गोड बोलून आणि पूर्ण विश्वास संपादन करून शेतात काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवण्यात आले आहे. याप्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ग्रामीण भागात घडलेल्या या थरारक प्रकारामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास करंबेळे धावडेवाडी मार्गालगत हा प्रकार घडला. सरिता पांडुरंग वाजे (वय ६७, रा. वांझोळे बुद्रुक, गवळीवाडी, देवरूख) या आपल्या म्हशी चरवत असताना शेतातील चारा काढण्याच्या कामात व्यस्त होत्या. सकाळची वेळ आणि आजूबाजूला फारशी वर्दळ नसलेली निर्मनुष्य परिस्थिती असल्याचा फायदा घेत एक अनोळखी व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचली. अत्यंत धूर्तपणे त्याने महिलेकडे विळा मागितला आणि भेंडीचे दोर काढायचे असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. वृद्ध महिलेनेही विश्वासाने त्याला विळा हातात दिला, त्यानंतर तो भेंडी काढण्याचे नाटक करू लागला.

मात्र, मनात वेगळाच कट रचलेल्या त्या चोराने संधी साधत थेट महिलेच्या गळ्यातील सोन्यावर झडप घातली आणि तब्बल १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. यानंतर काही अंतरावर उभ्या केलेल्या दुचाकीवर स्वार होऊन त्याने घटनास्थळावरून धूम ठोकली. काही कळण्याच्या आतच चोरटा पसार झाल्यामुळे हतबल झालेल्या आजीबाईंना मोठा मानसिक धक्का बसला.

Kokan camp

या घटनेची माहिती समजताच परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे करत आहेत. दिवसाढवळ्या अशा पद्धतीने गुन्हे करून दुचाकीवरून पसार होणाऱ्या सराईत चोराचा शोध घेण्याचे आणि त्याला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आता देवरूख पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.