अधिकाऱ्यांच्या पदाचा उपयोग काय?; पोंटखराब जमिनीचा प्रश्न आठवड्यात सोडवण्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे सक्त निर्देश
रत्नागिरी:
शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना लहान-मोठ्या कामांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर अधिकाऱ्यांच्या पदाचा उपयोग काय, असा सविसवाल आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जिल्हाधिकारी कार्यालययील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये त्यांनी विविध विभागाकडील प्रलंबित तक्रारींचा कडक आढावा घेतला. तसेच लोकशाही दिनाला विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे निर्देश व कडक इशारा

पुढील लोकशाही दिनापूर्वी सर्व प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीचा प्रस्ताव दाखल केला जाईल, असा सज्जड इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. नागरिकांना आपल्या कामांसाठी वारंवार कार्यालयात फेऱ्या मारायला लावू नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीत एका शेतकऱ्याला पोंटखराब जमिनीच्या नोंदीसाठी वर्षभरापासून चकरा माराव्या लागत असल्याच्या प्रकरणावर जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा प्रश्न याच आठवड्यात निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी दिले असून राजापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या अखत्यारीतील तालुक्यांमध्ये पोंटखराब क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी विशेष आढावा मोहीम राबवावी, अशी सूचनाही केली.
अनधिकृत गेट हटवून रस्ता खुला करण्याचे आदेश
अनधिकृतपणे चिऱ्याचे गेट उभारून रस्ता बंद केल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी रत्नागिरीच्या तहसीलदारांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहेत. तक्रारीतील वस्तुस्थिती खरी आढळल्यास तातडीने रस्ता खुला करून तक्रारदाराला दिलासा द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. "लोकशाही दिन ही केवळ औपचारिकता नसून जनतेला न्याय देणारे व्यासपीठ आहे. आपण जनतेचे सेवक आहोत, याचे भान प्रत्येक विभागप्रमुखाले ठेवले पाहिजे," असे सांगत लोकशाही दिनाला गैरहजर राहणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी जिंदल यांनी दिला.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एम. एस. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद्र बिरादार, तहसीलदार म्हातारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.













