कुडली-चिपळूण बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले; चार प्रवासी जखमी
गुहागर :
गुहागर शहरानजीकच्या शीरभाटले आंबेकरवाडी परिसरात बुधवारी सकाळी मुक्कामी असलेली कुडली ते चिपळूण एसटी बस अचानक अपघातग्रस्त झाली. धावत्या एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी बसमधील चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बुधवारी सकाळी कुडली येथून नियमित मुक्कामी असलेली एसटी बस प्रवाशांना घेऊन चिपळूणच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. सकाळच्या वेळी सुटणाऱ्या या बसमध्ये नेहमीप्रमाणे स्थानिक व्यापारी, नोकरदार वर्ग, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी आणि इतर प्रवाशांची मोठी गर्दी होती. ही बस गुहागर तालुक्यातील शीरभाटले येथील आंबेकरवाडी परिसरात पोहोचली असता, अचानक बसचा स्टेअरिंग रॉड तुटण्याचा गंभीर तांत्रिक बिघाड झाला.
धावत्या बसमध्ये अचानक स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा पूर्णपणे सुटला. काही क्षणांतच बस अनियंत्रित झाल्याने आत बसलेल्या प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. नेमके काय घडले हे समजण्यापूर्वीच बस रस्त्याच्या कडेला जाऊन अपघातग्रस्त झाली. या घटनेत बसमधील चार प्रवाशांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली.

अपघाताचा अंदाज येताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अपघाताची तीव्रता सुदैवाने कमी असल्याने मोठा अनर्थ आणि प्राणहानी टळली आहे. मात्र, धावत्या एसटी बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटल्यामुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांच्या सुरक्षेचा आणि देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.













