रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची कारवाई; इतर वाहनांना धोका निर्माण केल्याप्रकरणी नोंद
रत्नागिरी :
रत्नागिरी शहरानजीक असलेल्या कारवांजीवाडी फाटा येथे वाहतुकीला अडथळा आणि धोका निर्माण होईल अशा बेजबाबदार पद्धतीने आपल्या कार उभ्या केल्याप्रकरणी दोघा जणांविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, प्रशांत मोहन घाणेकर (वय ३४, रा. खेडशी डफळवाडी, रत्नागिरी) याने आपली कार (एमएच-०८-डब्ल्यू-४१९८) आणि सुभाष चंद्रकांत खेत्री (वय ३७, रा. खेडशी, रत्नागिरी) याने आपली कार (एमएच-०८-बीके-०९८३) ही वाहने इतर वाहनांच्या सुरळीत वाहतुकीला अडथळा होईल आणि प्रवाशांना धोका निर्माण होईल अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी पार्क केली होती.
या प्रकारामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने पोलिसांनी या दोन्ही वाहनचालकांविरोधात कडक पावले उचलली आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.














