केंद्रीय कॅबिनेटचा ऐतिहासिक निर्णय; अग्निवीरांच्या वेतनातही होणार वाढ
नवी दिल्ली:
केंद्र सरकारने अग्निवीर योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत या ऐतिहासिक निर्णयाची माहिती दिली.
योजनेच्या मूळ तरतुदीनुसार, चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर केवळ २५ टक्के अग्निवीरांना सैन्यदलात कायमस्वरूपी सेवा करण्याची संधी मिळत होती. मात्र, आता भारतीय सैन्यदलांच्या शिफारशीनुसार आणि अग्निवीरांकडून मिळालेल्या प्रतिसादाचा विचार करून या टक्केवारीत मोठी वाढ करण्यात आली असून, ती थेट ७५ टक्क्यांवर नेण्यात आली आहे. यासाठी चार वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण करणाऱ्या ७५ टक्के अग्निवीरांचा कार्यकाळ आणखी २ वर्षांनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
नवीन नियमानुसार, चार वर्षांचे प्रशिक्षण व सेवा पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना अतिरिक्त २ वर्षांचा कार्यकाळ मिळेल. हा २ वर्षांचा विस्तारित कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर हे सर्व ७५ टक्के अग्निवीर भारतीय सैन्यदलात नियमित व कायमस्वरूपी सेवेसाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी संबंधित अग्निवीराची इच्छा आणि सैन्यदलाच्या निवड प्रक्रियेतील शारीरिक व तांत्रिक पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.

मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक, सर्वंकष आढावा घेऊन आणि लष्करी संघटनात्मक सुसज्जतेचा समतोल साधण्यासाठी घेतला आहे. या २ वर्षांच्या अतिरिक्त कालावधीत अग्निवीरांच्या वेतनात (Salary) देखील टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता जास्तीत जास्त अग्निवीरांना भारतीय सैन्यदलात कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याचा मार्ग सुकर आणि मोकळा झाला आहे.
अग्निवीर योजना सुरू झाल्यापासून देशभरात पारदर्शक पद्धतीने जिल्हास्तरावर भरती प्रक्रिया राबवली गेली आहे, ज्याद्वारे महिलांनाही सैन्यदलाच्या विविध विभागांत सेवेची संधी मिळाली आहे. या योजनेमुळे जवानांमध्ये उच्च दर्जाची शारीरिक तंदुरुस्ती, मनोबल, तांत्रिक अनुकूलनक्षमता आणि कडक शिस्त निर्माण होत आहे. आता ७५ टक्के अग्निवीरांना २ वर्षांचा अतिरिक्त कार्यकाळ व त्यानंतर कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळाल्यामुळे देशभरातील हजारो लष्करी आकांक्षी तरुणांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.













