मोठ्या गटात गडकोट मावळे प्रतिष्ठान (कोंडवी), तर लहान गटात अर्णव निंबरे व सहकाऱ्यांनी पटकावला प्रथम क्रमांक
*हरचिरी (रत्नागिरी) : *छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास, स्वराज्याची गौरवगाथा आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उदात्त हेतूने संजीवन प्रतिष्ठान, चांदेराई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सलग आठव्या वर्षातील ‘गड-किल्ल्यांचा जागर २०२६’ या भव्य दिवाळी गड-किल्ले निर्मिती स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मंगळवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. अभय तेली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर त्यांच्यासमवेत पोलीस हवालदार श्री. सनगरे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. स्पर्धेचे परीक्षण देवरुख येथील श्री. होडे सर, पावस हायस्कूलचे श्री. भेळेकर सर आणि हरचिरी-उमरे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. योगेश गजानन शेट्ये सर यांनी केले. तिन्ही परीक्षकांनी स्पर्धकांनी साकारलेल्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे बारकाईने परीक्षण करून त्यांच्या कल्पकतेला आणि कलात्मकतेला योग्य न्याय दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :

मोठा गट (गडकोट मावळे खुला गट) – विजेते :
प्रथम क्रमांक : गडकोट मावळे प्रतिष्ठान, कोंडवी (प्रतिकृती – पन्हाळगड – विशाळगड – पावनखिंड).
द्वितीय क्रमांक : शिवभक्त ग्रुप, टिके कांबळेवाडी (प्रतिकृती – किल्ले रायगड).
तृतीय क्रमांक : जय हो ग्रुप, झरेवाडी (प्रतिकृती – किल्ले रायगड).
उत्तेजनार्थ पारितोषिके : जय हनुमान हौशी कलाकार, झरेवाडी (प्रतिकृती – पन्हाळा – पावनखिंड – विशाळगड) आणि युवा ग्रुप, टिके कांबळेवाडी (प्रतिकृती – राजगड).
लहान गट (६ ते १५ वयोगट – छोटे किल्लेदार) – विजेते :
प्रथम क्रमांक : अर्णव निंबरे व सहकारी, कोंडवी (किल्ला – शिवनेरी).
द्वितीय क्रमांक : शिवप्रेमी ग्रुप सहारा, टिके कांबळेवाडी (प्रतिकृती – पन्हाळा – विशाळगड – पावनखिंड).
तृतीय क्रमांक : जय काळकेश्वर ग्रुप (किल्ला – लोहगड).
उत्तेजनार्थ पारितोषिके : वेदांत रवींद्र पावसकर, कोंडवी (किल्ला – जंजिरा) आणि दुर्वा विनोद तळेकर व ग्रुप, हरचिरी (किल्ला – प्रतापगड).
इतिहासाची ओळख आणि बालकलागुणांना व्यासपीठ :
प्रत्येक स्पर्धकाने आपल्या घरीच पन्हाळगड, विशाळगड, रायगड, राजगड, शिवनेरी, लोहगड, जंजिरा आणि प्रतापगड यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती अत्यंत कल्पकतेने साकारल्या होत्या. विशेषतः पन्हाळगड ते विशाळगड आणि पावनखिंडीचा शौर्यगाथेशी जोडलेला देखावा उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. आजच्या डिजिटल युगात मुलांना प्रत्यक्ष कृतीतून इतिहासाशी जोडणारा संजीवन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. संयोग ऊर्फ दादा दळी यांचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
या बक्षीस वितरण सोहळ्याला संजीवन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. संयोग ऊर्फ दादा दळी, सचिव श्री. महेश गांगण, मुख्याध्यापक श्री. योगेश गजानन शेट्ये, केंद्रप्रमुख श्री. समीर कारेकर, श्री. पंकज दळी, श्री. ईश्वर दळी, श्री. प्रसाद बेर्डे, श्री. दर्शन दळी, ॲड. ओंकार दळी, श्री. स्वरूप गांगण, श्री. निखिल दळी, श्री. अष्टम दळी, श्री. गौरव शिंदे, श्री. विनायक शिंदे, श्री. रुपेश शिंदे, श्री. अमर शिंदे, विशेष कार्यकारी अधिकारी श्री. दत्ताराम निंबरे यांच्यासह मान्यवर, ग्रामस्थ आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













