१५० वर्षे जुन्या इमारतीच्या जागी उभारली जाणार नवी वास्तू; दोन ते अडीच वर्षांत काम पूर्ण होण्याचा विश्वास
चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नगर परिषदेची १५० वर्षे जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी आता नवीन आणि अद्ययावत प्रशासकीय इमारत (chiplun nagar parishad building) बांधली जाणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे भूमिपूजन आज, शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडणार आहे. भूमिपूजन सोहळ्यानंतर येत्या दोन ते अडीच वर्षांत ही नवीन वास्तू दिमाखात उभी राहील, असा विश्वास नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यक्त केला आहे.
सध्याच्या घडीला चिपळूण नगरपालिकेचा दैनंदिन प्रशासकीय कारभार हा शहरातील बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र या दोन वेगवेगळ्या ठिकाणी विभागला गेला आहे. त्यामुळे नागरिकांची आणि प्रशासकीय कामकाजाची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या नवीन इमारतीची उभारणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी; मान्यवरांची राहणार उपस्थिती
चिपळूण नगरपालिका प्रशासनातर्फे या भूमिपूजन सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबतच राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

तसेच, या महत्त्वाच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी चिपळूणमधील सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी नगराध्यक्ष आणि शहरातील नागरिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. या अद्ययावत इमारतीमुळे चिपळूणच्या वैभवात भर पडणार असून नागरिकांना एकाच छताखाली सर्व प्रशासकीय सेवा मिळणे सोपे होणार आहे.













