मंडणगडमधील केळवत घाटात कार-दुचाकीची समोरासमोर धडक; तीन जण गंभीर जखमी, पुण्याच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल!

मंडणगडमधील केळवत घाटात कार-दुचाकीची समोरासमोर धडक; तीन जण गंभीर जखमी, पुण्याच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल!

उताराच्या वळणावर घडला अपघात; पाच दिवसांनंतर मंडणगड पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद

मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड तालुक्यातील केळवत घाटाच्या उताराच्या वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव मारुती ब्रेझा कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तिघेजण लहान-मोठ्या व गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. ही अपघाताची घटना शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी १२ नोव्हेंबर रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात पुण्यातील कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केळवत घाटाच्या वळणावर घडला अपघात :

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर (ता. मंडणगड) येथील रहिवासी राजु नबीसाब मुल्ला (वय ५२ वर्षे) हे आपल्याकडे कामाला असलेले कामगार देवकुमार खैरवाल आणि जैमुद्दीन शेख यांना घेऊन दुचाकीवरून (क्र. MH 08 X 7357) मंडणगडच्या दिशेने येत होते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते केळवत घाटाच्या उताराच्या वळणावर आले असता, समोरून येणाऱ्या मारुती ब्रेझा कारने (क्र. MH 12 ZS 5247) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही कार आशुतोष अशोक पंढरपुरकर (वय ५४ वर्षे, रा. उजवी भुसारी कॉलनी, पौड रोड, कोथरूड, पुणे) हे चालवत होते.

Pednekar sankul

अपघातातील जखमींची नावे :

या धडकेत दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेल्याने त्यांना लहान-मोठ्या व गंभीर दुखापती झाल्या आहेत. जखमींची नावे खालीलप्रमाणे आहेत:

राजु नबीसाब मुल्ला : वय ५२ वर्षे, रा. पालघर, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी.

देवकुमार मेहलाल खैरवाल : वय २७ वर्षे, रा. महाड, जि. रायगड (मूळ रा. मुड्यार, ता. मजगवा, जि. मध्यप्रदेश).

जैमुद्दीन आलम शेख : वय ४२ वर्षे, रा. सौमित्रनगर, बायपास, मुंब्रा, जि. ठाणे.

पुण्याच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंद :

या अपघाताप्रकरणी जखमी राजु मुल्ला यांचे बंधू मेहबुब नबीसाब मुल्ला (वय ४९ वर्षे, रा. पालघर, ता. मंडणगड) यांनी गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.२१ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी कार चालक आशुतोष अशोक पंढरपुरकर याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १३३/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मंडणगड पोलीस करत आहेत.