घरबसल्या सादर करता येणार हयातीचा दाखला; ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मोहीम सुरू राहणार असल्याची जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण बिरादार यांची माहिती
रत्नागिरी: Digital Life Certificate Campaign अंतर्गत निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागामार्फत पाचवी राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र (DLC) मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत राबवली जाणार असून, रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १४ हजार ५०० निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
शासकीय निवृत्तीवेतन नियमित सुरू राहण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक असते. यापूर्वी यासाठी बँक किंवा कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागत होते. मात्र, आता अँड्रॉइड मोबाईलवर ‘जीवन प्रमाण’ ॲप आणि ‘आधार फेस आयडी’ ॲप डाउनलोड करून चेहरा पडताळणीद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करता येते. हे प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने ज्येष्ठ नागरिकांची कार्यालयात जाण्याची धावपळ टळणार आहे.
डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करताना नाव, [Aadhaar Redacted], बँक खाते क्रमांक आणि पीपीओ क्रमांक अचूक नोंदवणे आवश्यक आहे. तसेच वितरण संस्था आणि कोषागारातील निवृत्तीवेतन नोंदणीमध्ये ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट’ची नोंद अचूक असणे गरजेचे आहे. निवृत्तीवेतनधारकांनी स्वतः ‘जीवन प्रमाण’ ॲपद्वारे डिजिटल प्रमाणपत्र सादर करावे, संबंधित बँकेची शाखा, जिल्हा कोषागार कार्यालयाच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण बिरादार यांनी केले आहे.














